चिपळूण नगर परिषदेचा अडीच कोटींचा निधी वाचवा ओ वाचवा ; नगरसेविका रसिका देवळेकर यांचे भावनिक आवाहन
🖥️ Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴 चिपळूण : दि. २४ शहरातील स्वामी मठ ते महाराष्ट्र हायस्कूल रस्त्यासाठी मंजूर झालेला सुमारे अडीच कोटींचा निधी मार्चअखेर खर्च न पडल्यास परत जाणार आहे . तरी हे काम लवकर मार्गी लावून नगर परिषदेचा निधी वाचवावा , असे भावनिक आवाहन नगरसेविका रसिका देवळेकर यांनी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे व मुख्याधिकारी डॉ . वैभव विधाते यांच्याकडे काल मंगळवारी एका पत्राद्वारे केले आहे .
शहरातील वाहतूक व्यवस्थेच्यादृष्टीने स्वामी मठ ते महाराष्ट्र हायस्कूल रस्ता महत्वपूर्ण मानला जात आहे . या रस्त्यामुळे नवीन बायपास रस्ता तयार होणार आहे . या रस्त्यासाठी जिल्हा नियोजनकडून अडीच कोटींचा निधी प्राप्त झाला आहे . मात्र हा निधी तातडीने खर्च होणे गरजेचे आहे . तसेच या रस्त्यावर पाईप मोरींची कामे पावसाळ्यापूर्वी होणे गरजेचे आहे . जेणेकरून तिथे होत असलेले अपघात टळू शकतात .
स्वामी मठ रस्त्याच्या बाजुला असलेले गटार खोदून ठेवल्याने तेथील गाळेधारकांना त्याचा त्रास होत आहे . पवन तलाव मैदानावरील खोदलेल्या गटाराचाही खेळाडूंना त्रास होतो . तरी लवकरच यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे . तसेच चिपळूणचे श्रद्धास्थान असलेले ग्रामदैवत भैरी परिसरातील रस्ते भरपूर खराब झालेले आहेत . तरी पावसाळ्यापूर्वी त्या रस्त्यांची कामेही मार्गी लागणे गरजेचे आहे .
याबरोबरच जिप्सी कॉर्नरपासून ते होळीपर्यंत रस्ता हा वाढत्या रहदारीच्यादृष्टीने १२ मीटरचा होणे आवश्यक असल्याची मागणीही नगरसेविका देवळेकर यांनी या पत्राव्दारे केली आहे .

