कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾ श्री बांदेश्वर मंदिरात महाशिवरात्री सोहळा  उत्साहात साजरा..

 

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

  🎴बांदा,दि-१५:- बांदा येथिल प्रसिद्ध जागृत स्वयंभू श्री देव बांदेश्वर मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावऱणात साजरा करण्यात आला. यानिमित्त परंपरेप्रमाणे चार दिवस  विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यंदा कोरोना विषयक दक्षतासंबंधी शासनाच्या नियमाचा अवलंब करुन दर्शन घेण्याबाबतच्या सुचना देवस्थानतर्फे भाविकांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार मास्क ,सँनिटायझर तसेच सोशल डिस्टन्सिंग आदिंचे अवलंबन करण्यात आले.भाविकांचे यासाठी चांगले सहकार्य मिळाले.

बुधवार दि.१० रोजी रात्रौ मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणेने हा सोहळा आरंभ झाला. गुरुवार दि.११ रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी सुर्योदयापासून ते दुसऱ्या दिवशी सुर्योदयापर्यंत स्वयंभू शिवलिंगावर ब्राम्हणवृंदांच्या मंत्रोच्चारात अष्टौप्रहर रुद्रावर्तने करण्यात आली. भाविकांनी रांगेत राहून मंदिराबाहेरुन अभिषेक सुविधेद्वारे जलाभिषेक केला. श्री शिवलिलामृत ग्रंथ पठणात अनेक भाविकांनी सहभाग घेतला. सायंकाळी भजन तसेच रात्री पालखी सोहऴा झाला.

तिसऱ्या दिवशी शुक्रवार दि.१२ रोजी सायं. ५ वाजता श्रींच्या सवाद्य  पालखी फेरीचे तरंगांसहित श्री पाटेश्वर भेटीस प्रस्थान झाले. श्री पाटेश्वर मंदिर येथे भजन करुन पारंपारिक राजमार्गाने पालखी परत मंदिराकडे आली. मार्गात भाविकांनी जागोजागी  रांगोळ्या घालून मार्ग सुशोभित केला होता. रात्री मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा होऊन भजन व आरती करून सर्वांच्या कल्याणासाठी गाऱ्हाणे घालण्यात आले. रविवारी दुपारी समाराधना होऊन सोहऴ्याची सांगता झाली.

या सोहऴ्यानिमित्त मंदिरावर आकर्षक रोषणाई व सजावट करण्यात आली होती. भाविकांनी मास्कचा वापर केला .मंदिरातील सभामंडप तसेच मंदिर परिसर प्रशस्त असल्याने भाविकांना गर्दी टाळून सोशल डिस्टन्स पाळत दर्शन घेणे सुलभ ठरले.तसेच यावर्षी नियमावलीला सहकार्य करत नाट्यप्रयोग कार्यक्रम रद्द करण्यात आला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!