कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

आंबोली फॉरेस्ट नाक्यावर गोवा बनावटीच्या दारूची मोठी तस्करी उधळली!

आंबोली फॉरेस्ट नाक्यावर गोवा बनावटीच्या दारूची मोठी तस्करी उधळली!

टाटा सुमोसह ३.४८ लाखांचा मुद्देमाल जप्त; पुण्यातील एकास अटक

सावंतवाडी, दि २१ : गोव्यातून महाराष्ट्रात अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्यांविरोधात आंबोली पोलिसांनी धडक कारवाई करत मोठी दारू तस्करी उधळून लावली. आंबोली फॉरेस्ट नाक्यावर सापळा रचून पोलिसांनी टाटा सुमो वाहनासह तब्बल ३ लाख ४८ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुणे जिल्ह्यातील एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. २१ जून) पहाटे सुमारे १.१० वाजण्याच्या सुमारास बांदा- संकेश्वर महामार्गावरील आंबोली फॉरेस्ट नाक्यावर पोलिसांनी संशयित वाहनांची तपासणी सुरू असताना एमएच-४२-के-०२६९ क्रमांकाची टाटा सुमो गोल्ड संशयास्पद आढळली. वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये गोवा बनावटीची ‘इम्पिरियल ब्ल्यू हँड पिक्ड ग्रेन व्हिस्की’ या ब्रँडच्या १८० मिली क्षमतेच्या तब्बल ५७६ बाटल्या आढळून आल्या.
या दारूची किंमत ४८ हजार ९६० रुपये, तर जप्त करण्यात आलेल्या वाहनाची किंमत ३ लाख रुपये असून एकूण ३ लाख ४८ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
या प्रकरणी गोपीनाथ दगडू शितोळे (वय ४०, रा. वरवंड गणेशवाडी, ता. दौंड, जि. पुणे) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (अ) व (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार रामदास जाधव, मनिष शिंदे, गौरव परब तसेच होमगार्ड आनंद बरागडे यांनी केली.
दारू तस्करांचे धाबे दणाणले
गोवा-महाराष्ट्र सीमावर्ती भागातून सुरू असलेल्या अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांनी पुन्हा एकदा करडी नजर ठेवली असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. आंबोली घाटमार्गाचा वापर करून होणाऱ्या तस्करीला लगाम घालण्यासाठी अशा कारवाया अधिक तीव्र करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!