महाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

*योग ही भारताची जगाला दिलेली अमूल्य देणगी; निरोगी जीवनासाठी योगाचा स्वीकार करा – सीताराम गावडे*

*ऑर्बिट योगा स्टुडिओच्या आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात मान्यवरांचे प्रतिपादन; योग प्रात्यक्षिकांनी रंगली उपस्थितांची मने*

सावंतवाडी, दि २१ : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार सीताराम गावडे यांनी योगाचे महत्त्व अधोरेखित केले. “योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी असून तो केवळ व्यायाम नसून शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधण्याचा प्रभावी मार्ग आहे. योग्य गुरुंच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास केल्यास त्याचा निश्चितच लाभ होतो. ऑर्बिट योगा स्टुडिओचे प्रशिक्षक अमोल सोनावणे हे सक्षम आणि अनुभवी योगगुरू असून त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ सर्वांनी घ्यावा व आपले आरोग्य निरोगी ठेवावे,” असे आवाहन त्यांनी केले.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ऑर्बिट योगा स्टुडिओ, सावंतवाडी यांच्या वतीने धनश्री मंगल कार्यालय येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धा राजे भोसले होत्या. व्यासपीठावर तहसीलदार श्रीधर पाटील, डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर, डॉ. चौगुले, संदीप कुडतरकर तसेच युवराज लखमराजे भोसले उपस्थित होते.
यावेळी वक्त्यांनी नियमित योगाभ्यासाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, योगामुळे शरीर निरोगी राहते, मन शांत होते आणि एकाग्रता वाढते. आजच्या धकाधकीच्या जीवनात तणाव, चिंता आणि विविध आजारांपासून दूर राहण्यासाठी योग अत्यंत उपयुक्त ठरतो. योगामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून सकारात्मक विचारांची जडणघडण होते.
सीताराम गावडे यांनी पुढे बोलताना सांगितले की, ऑर्बिट योगाचे संचालक विनेष तावडे आणि प्रशिक्षक संचालक अमोल सोनावणे यांनी एका छोट्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर केले आहे. त्यांच्या अथक परिश्रमामुळे सावंतवाडीत योग चळवळ अधिक व्यापक होत असून त्याचा अभिमान वाटतो.
यावेळी नगराध्यक्षा श्रद्धा राजे भोसले व तहसीलदार श्रीधर पाटील यांनीही उपस्थितांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा देत योगाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात संगीताच्या ठेक्यावर आकर्षक योग प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. सहभागींच्या उत्कृष्ट सादरीकरणाचे मूल्यमापन करून त्यांना क्रमांक देत गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी निवृत्त शिक्षक भरत गावडे, तहसीलदार श्रीधर पाटील आणि ज्येष्ठ पत्रकार सीताराम गावडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
योग दिनाच्या निमित्ताने आयोजित हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. उपस्थितांनी योगाचा दैनंदिन जीवनात समावेश करून निरोगी, आनंदी आणि सुदृढ जीवन जगण्याचा संकल्प व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!