◾ निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याची बदली वादाच्या भोवऱ्यात..
◾लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता बदली केल्याचा आरोप..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी दि.१२:- निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांची बदली वादात सापडली आहे.स्थानिक आमदारांच्या नावाचा गैरवापर करून ही प्रक्रिया राबविण्यात आली,असा आरोप पंचायत समिती सदस्य बाबू सावंत यांनी केला.दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी प्रशासनाकडे केली आहे. याबाबत आज पंचायत समिती सभापती मानसी धुरी यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागाची विशेष बैठक घेण्यात आली.त्यानंतर आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपसभापती शितल राउळ,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विजय नांद्रेकर,माजी सभापती रवींद्र मडगावकर,संदीप नेमळेकर,तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर आदींसह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आयोजित बैठकीत निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्र नव्याने रुजू झालेल्या संबंधित महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांची बदली कोणत्या कारणासाठी करण्यात आली?, असा जाब उपस्थित आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारण्यात आला,मात्र त्यांच्याकडून कोणती समर्पक उत्तरे मिळाली नाहीत,असा आरोप करत याबाबत तालुका प्रशासनाला किंवा स्थानिक आमदारांना कोणती माहित न देता हा प्रकार घडतो हे चुकीचे आहे,अशी नाराजी सभापती सौ. धुरी यांनी व्यक्त केली.
यावेळी श्री.सावंत पुढे म्हणाले, संबंधित महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांची झालेली बदली ही अंतर्गत राजकारणातून आहे.हा प्रकार तेथेच कार्यरत असलेल्या एका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून घडला आहे. त्यांनीच स्थानिक लोकांना हाताशी धरून हे राजकारण केले. तर या प्रकरणात चक्क स्थानिक आमदारांच्या नावाचा सुद्धा गैरवापर करण्यात आला आहे, असाही आरोप त्यांनी यावेळी केला.

