◾ भाजपा सहकार्यातून घारपी गावात प्रथमच क्रिकेटचा सोहळा..
◾ मुंबई, गोव्यासह गावातील चाकरमानीही लीगमध्ये मोठ्या संख्येने सहभागी..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी :शैलेश गवस
🎴बांदा, दि-१२ :- प्रिमियर लीग क्रिकेट सामने म्हणजे संपूर्ण गावासाठी एखादा सोहळा असल्याचे दुर्मिळ चित्र घारपी गावात पहायला मिळाले. आबालवृद्धांसह संपूर्ण गावच क्रिकेट मैदानावर अवतरला होता. मुंबई, गोव्यासह गावातील चाकरमानीही लीगमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांच्या चेहर्यावर ओसंडून वाहणारा आनंद केवळ अवर्णनीय असाच होता.घारपी गाव सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी जंगलमय भागात वसला आहे. सर्वत्र जंगल असल्याने गावातील युवकांना क्रिकेट खेळण्यासाठी मैदान नव्हते. ही बाब गावातील युवकांनी सावंतवाडी तालुका युवा मोर्चा भाजपा तालुकाध्यक्ष मकरंद तोरसकर व बांदा सरपंच अक्रम खान यांच्या कानावर घातली. गावापासून दूर सुमारे २ किमी अंतरावर सामाईक क्षेत्रातील जमिनीत मैदान करण्याचे निश्चित करण्यात आले. मकरंद तोरसकर व अक्रम खान यांनी स्वखर्चाने मैदान करण्याचे आश्वासन दिले. दुसर्या दिवसापासून जेसीबीच्या सहाय्याने प्रत्यक्ष कामाला सुरूवातही केली. १५ दिवसांच्या अथक परिश्रमातून मैदानाची उभारणी करण्यात आली.
श्री शिव छत्रपती कला क्रीडा मंडळाच्या वतीने गावात प्रथमच क्रिकेट प्रिमीअर लीगचे सामने आयोजित करण्यात आले. हे सामने पाहण्यासाठी संपूर्ण गावच मैदानावर लोटला होता. वृद्ध व महिलांची संख्या तर लक्षणीय होती. मुंबई, गोव्यासह विविध भागातील चाकरमानीही गावात खास क्रिकेट खेळण्यासाठी दाखल झाले होते.
या मैदानाचे उद्घाटन सावंतवाडी पं. स. उपसभापती शीतल राऊळ, मकरंद तोरसकर व अक्रम खान यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गुरुनाथ सावंत, साहील कल्याणकर, ऋषी हरमलकर, निवृत्त शिक्षक लवू गावडे, दीपक गावडे, संघमालक विजय गावकर, शिवराम गावडे, जितेंद्र गावडे, बाळा वाडकर, नारायण गावडे, मनोज कविटकर, गजानन सावंत आदींसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी गावातील ज्येष्ठ व्यक्तींचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मकरंद तोरसकर यांनी युवकांनी संघटितपणे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान द्यावे. भाजपा आपल्या पाठीशी ठामपणे उभी राहील असे अभिवचन दिले.
घारपी गावात क्रिकेट मैदानाचे उद्घाटन करताना सावंतवाडी युवा मोर्चा भाजपा तालुकाध्यक्ष मकरंद तोरसकर, उपसभापती शीतल राऊळ, बांदा सरपंच अक्रम खान, गुरुनाथ सावंत व अन्य.

