“पत्रकारांच्या हक्काच्या घरांसाठी नितेश राणे मैदानात; ‘सिंधूदर्पण’ प्रकल्पाचे भूमिपूजन उत्साहात”
“पत्रकारांच्या हक्काच्या घरांसाठी नितेश राणे मैदानात; ‘सिंधूदर्पण’ प्रकल्पाचे भूमिपूजन उत्साहात”
“राणेसाहेबांनी जोडलेली माणसं टिकवणं हीच खरी जबाबदारी; पत्रकारांच्या घरांचे स्वप्न पूर्णत्वाला नेणार” — पालकमंत्री नितेश राणे
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गातील पत्रकारांना हक्काचे, सुरक्षित आणि सर्व सुविधांनी युक्त घर मिळावे या उद्देशाने उभारण्यात येणाऱ्या ‘सिंधूदर्पण’ पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झालेल्या या सोहळ्याने पत्रकारांच्या अनेक वर्षांच्या घराच्या स्वप्नाला प्रत्यक्ष आकार मिळाला.
यावेळी बोलताना पालकमंत्री नितेश राणे यांनी राणे कुटुंब आणि सिंधुदुर्गातील जनतेमधील जिव्हाळ्याचे नाते अधोरेखित करत, “राणेसाहेबांनी हजारो लोकांचे संसार उभे केले. त्यांनी जोडलेली माणसं टिकवणं आणि विकासाचा वारसा पुढे नेणं हीच आमची जबाबदारी आहे,” असे स्पष्ट केले.
पत्रकारांच्या घरांच्या प्रश्नाला प्राधान्य देत हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली. “आज भूमिपूजन झाले आहे; उद्या पत्रकारांच्या हातात घरांच्या चाव्या देण्याचा सोहळाही तितक्याच दिमाखात पार पडेल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
*“आमच्याकडे आउटगोइंग फ्री, इनकमिंग बंद!”*
आपल्या खास शैलीत बोलताना नितेश राणे म्हणाले, “आमच्याकडे आउटगोइंग फ्री आहे आणि इनकमिंग बंद आहे. म्हणजे घेण्याचा विषयच नाही. लोकांच्या अडचणी सोडवणं हेच आमचं काम आहे.” त्यांच्या या वक्तव्याला उपस्थितांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला.
ते पुढे म्हणाले की, वाडी-वस्त्यांपासून वंचित घटकांपर्यंत पोहोचून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक प्रकल्पावर वैयक्तिक लक्ष ठेवून दर्जेदार काम वेळेत पूर्ण करण्यावर भर असल्याचेही त्यांनी सांगितले.
*राज्यातील पहिलाच पत्रकार गृहनिर्माण प्रकल्प*
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी प्रकल्पाच्या प्रशासकीय प्रक्रियेची माहिती देताना सांगितले की, “राज्यात पत्रकारांसाठी अशा प्रकारचा प्रकल्प उभारला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. सिंधुदुर्ग जिल्हा यामुळे राज्यात आदर्श ठरणार आहे.”
त्यांनी सांगितले की, काही काळ रखडलेल्या या प्रकल्पाला २०२३-२४ नंतर गती मिळाली. आवश्यक निधी जमा झाल्यानंतर जागावाटप प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे प्रकल्पाला वेग मिळाला.
पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव
या कार्यक्रमात पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा प्रशस्तीपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, गृहनिर्माण सोसायटीचे चेअरमन संतोष राऊळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*“पत्रकारांचे घराचे स्वप्न आता प्रत्यक्षात”*
एस. एम. देशमुख यांनी या प्रकल्पाचे संपूर्ण श्रेय पालकमंत्री नितेश राणे यांना देत, “हा प्रकल्प राज्यासाठी आदर्श ठरेल. पत्रकारांचे अनेक वर्षांचे स्वप्न आता पूर्णत्वाकडे जात आहे,” असे सांगितले.
तर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी पत्रकारांच्या एकजुटीचे कौतुक करत, “पत्रकार हे केवळ व्यावसायिक नात्याने नव्हे तर कुटुंबाप्रमाणे जोडले गेले आहेत. हा प्रकल्प अनेक कुटुंबांचे आयुष्य बदलणारा ठरेल,” असे मत व्यक्त केले.

