आपत्कालीनकोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

आंबोली घाटात भीषण अपघात : चिमुकलीचा जागीच मृत्यू, पळणारा ट्रक उलटला – अडीच तास वाहतूक ठप्प

आंबोली घाटात भीषण अपघात : चिमुकलीचा जागीच मृत्यू, पळणारा ट्रक उलटला – अडीच तास वाहतूक ठप्प

आंबोली : आंबोली घाटातील जीवघेण्या वळणावर पुन्हा एकदा बेफाम वेगाने एका निरागस जीवाचा बळी घेतला आहे. फरशीने भरलेल्या सुसाट ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत १० वर्षीय निकिता प्रसाद राऊत (रा. फौजदारवाडी, आंबोली) हिचा जागीच मृत्यू झाला, तर तिची आई चैताली राऊत या गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेनंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेला ट्रक काही अंतरावरच घाटात उलटल्याने तब्बल अडीच तास वाहतूक ठप्प झाली.

रविवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास हा थरारक अपघात घडला. आंबोली घाटातील ‘यू’ आकाराच्या धोकादायक वळणावरून जात असताना समोरून येणाऱ्या ट्रकने दुचाकीला अक्षरशः चिरडले. धडक इतकी भीषण होती की, निकिताचा जागीच मृत्यू झाला. आई चैताली राऊत या गंभीर जखमी असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.

अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही अंतरावरच वेगावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक घाटात पलटी झाला. ट्रकमधील फरशा रस्त्यावर विखुरल्याने घाटातील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. प्रवाशांना तब्बल अडीच तास रस्त्यावरच थांबावे लागले.

घटनेची माहिती मिळताच संतप्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. “या बेफाम ट्रक चालकांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे” अशी मागणी करत स्थानिकांनी आक्रमक भूमिका घेतली. परिस्थिती तणावपूर्ण बनत असताना पोलिसांनी तातडीने धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, हवालदार रामदास जाधव, संतोष गलोले व त्यांच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत ग्रामस्थांना शांत केले आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. संबंधित ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, मृत निकिताचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात येणार असून, गंभीर जखमी चैताली राऊत यांनाही तेथे हलवण्यात येणार आहे.

या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण आंबोली परिसरात शोककळा पसरली असून, घाटातील अवजड वाहनांच्या वेगावर तातडीने नियंत्रण आणण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे.

प्रशासन अजून किती बळी घेणार? हा संतप्त सवाल आता प्रत्येकाच्या ओठांवर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!