सावंतवाडीत तालुक्यातील ओवळीये गावात जमिनीच्या वादातून महिलेचा कोयत्याने निर्घृण खून
सावंतवाडीत तालुक्यातील ओवळीये गावात जमिनीच्या वादातून महिलेचा कोयत्याने निर्घृण खून
सावंतवाडी, दि २९ : तालुक्यातील ओवळीये येथे आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली. जमिनीच्या जुन्या वादातून ६५ वर्षीय महिलेचा डोक्यात कोयता घालून निर्घृण खून करण्यात आल्याने परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृत महिलेचे नाव सरस्वती धोंडी सावंत (वय ६५) असे असून त्या आपल्या घराजवळच असताना संशयिताने अचानक हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. कोयत्याने डोक्यावर जोरदार वार केल्याने त्या जागीच कोसळल्या आणि त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा आणि तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून सखोल चौकशी केली जात आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, जमिनीच्या मालकीवरून हा वाद काही दिवसांपासून चिघळलेला होता. अखेर या वादाने आज रक्तरंजित वळण घेत एक निष्पाप जीव गेला.
या घटनेमुळे ओवळीये गावासह संपूर्ण सावंतवाडी तालुका हादरला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कायद्याचा धाक कमी झाल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर येत आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

