*पैशाच्या बळावर सत्ता मिळणार नाही; तळवडे जि. प. मतदारसंघातील जनता सुज्ञ
*पैशाच्या बळावर सत्ता मिळणार नाही; तळवडे जि. प. मतदारसंघातील जनता सुज्ञ* –
*स्थानिक उमेदवारालाच कौल..पैसा नाही तर आत्मसन्मान जिंकणार*
सावंतवाडी –
तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघात बाहेरील उमेदवार लादून कितीही पैसा वापरला, तरी येथील जनता पैशाच्या भूलथापांना बळी पडणार नाही, असा ठाम विश्वास मळगाव, नेमळे,तळवडे व निरवडे येथील ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना ग्रामस्थांनी स्पष्ट केले की, हा मतदारसंघ सुज्ञ असून तो स्थानिक आणि योग्य उमेदवारालाच मतदान करणार आहे.“पैशाच्या जोरावर माणसे विकत घेता येतील, पण मतदार नाहीत…अशी स्पष्ट भूमिका युवा कार्यकर्ते सुजय गावडे यांनी मांडली.
. कितीही पैसा वाटला, तरी मतदार ग्रामदेवतेला स्मरून आपले मत स्थानिक उमेदवारालाच देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तळवडे जि. प. मतदारसंघात अनेक सक्षम आणि तरुण स्थानिक चेहरे असताना पक्षाने कार्यकर्ते व मतदारांना विश्वासात न घेता बाहेरील उमेदवार लादल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. चुकीच्या मार्गाने जमा करून वाटला जाणारा पैसा या मतदारसंघात चालणार नाही. काही माणसे पैशाने विकत घेतली जात असतील, तरी ही संस्कृती येथे टिकणार नाही, असा इशाराही देण्यात आला.
“सिद्धेश्वर, भूतनाथ माऊली देवतेच्या साक्षीने सांगतो, या मतदारसंघात अशा प्रकारांना थारा मिळणार नाही,” असे ठाम मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. गोड बोलणे, सभ्यपणाचा आव आणणे किंवा ‘विकास मीच करू शकतो’ अशी छातीठोक भाषा वापरणे ही केवळ आश्वासनांची खेळी असून इतिहास पाहता ही मंडळी आश्वासनांपलीकडे काही देऊ शकलेली नाहीत, असा आरोपही करण्यात आला.
सध्या मतदारसंघात पाकिटांतून पैसे देण्याचे प्रकार सुरू असून मताला दहा ते पंधरा हजार रुपयांचे दर ठरल्याची चर्चा आहे. लक्ष्मी प्रत्येकाच्या दारात जाईल, लोक ती स्वीकारतीलही; मात्र मतदान मात्र स्थानिक उमेदवारालाच करतील, असा ठाम विश्वास सुजय गावडे यांनी व्यक्त केला.

