महिलेचा फोटो एडीट करून व्हायरल आरोपी तासांतच जामिनावर सुटला
* महिलेचा फोटो एडीट करून व्हायरल आरोपी तासांतच जामिनावर सुटला*
*दबाव टाकणारे’ अजूनही मोकाट? फोटो एडीट केलेला मोबाईल बेपत्ता*
*त्या महिलेला तक्रार देण्यापासून परावृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा*
सावंतवाडी, दि १ :
सोशल मीडियाचा गैरवापर करत एका महिलेची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार सावंतवाडीत उघडकीस आला आहे. एका महिलेचे वैयक्तिक फोटो एडिट करून ते अश्लील स्वरूपात व्हायरल केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी माजगाव येथील संशयित अंतोन लुईस देसा (वय ३६, रा. माजगाव–गरड) याला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असली, तरी या प्रकरणातील अनेक गंभीर प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहेत.
पीडित महिलेने आपल्या फोटोंचा गैरवापर होत असल्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास करत आरोपीला आज सकाळी अटक केली. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मात्र, या प्रकरणाचा खरा धक्का देणारा भाग वेगळाच आहे.
सदर प्रकार तब्बल दोन महिन्यांपूर्वी एका स्थानिक को-ऑपरेटिव्ह बँकेतील महिला कर्मचाऱ्याच्या बाबतीत घडला होता. बँकेची बदनामी होईल या भीतीने संबंधित महिलेवर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला. ती महिला दबावाला बळी पडत नाही, असे लक्षात येताच तिच्यावर बदलीची कारवाई करून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला.
अखेर मानसिक त्रासाला कंटाळून त्या महिलेने नोकरीचा राजीनामा देत, धैर्याने पोलिसांत तक्रार दाखल केली. हा प्रकार केवळ एका व्यक्तीचा गुन्हा होता की संस्थात्मक दबावाखाली रचलेली साखळी? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
आणखी गंभीर बाब म्हणजे,
ज्या मोबाईलमधून फोटो एडिट करून व्हायरल करण्यात आले, तो मोबाईल “विकला” गेल्याचे कारण देत हस्तगतच करण्यात आला नाही. सायबर तंत्रज्ञानाच्या युगात सर्व डेटा पुनर्प्राप्त होऊ शकतो, असे असताना सखोल सायबर तपास का झाला नाही? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
तसेच,
ज्या को-ऑपरेटिव्ह बँकेने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, त्या बँकेच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांची चौकशी होणार का?
दबाव टाकणारे नेमके कोण?
महिलेवर अन्याय करणाऱ्या व्यवस्थेतील घटकांवर कारवाई होणार का?
मुद्देमाल हस्तगत न होता आरोपीला न्यायालयीन कोठडी मिळाली असली, तरी खरे सूत्रधार अजूनही पडद्यामागे सुरक्षित आहेत का?
हा प्रश्न आता जनतेच्या मनात घर करून बसला आहे.
महिलांच्या सुरक्षिततेचा गवगवा करणाऱ्या व्यवस्थेचा हा चेहरा आहे का, असा सवाल उपस्थित करत या प्रकरणाचा तपास आरोपीपुरता मर्यादित न राहता दबाव टाकणाऱ्यांपर्यंत पोहोचणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

