कोकणदोडामार्गमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसिंधुदुर्ग

साटेली भेडशीमध्ये शिवसेना (शिंदे) अंतर्गत स्फोट!श्रेयाली गवस यांचा AB फॉर्म शेवटच्या क्षणी नाकारला, शिवसैनिक संतप्त*

साटेली भेडशीमध्ये शिवसेना (शिंदे) अंतर्गत स्फोट!श्रेयाली गवस यांचा AB फॉर्म शेवटच्या क्षणी नाकारला, शिवसैनिक संतप्त**

साटेली भेडशी | दि.२१ :
साटेली भेडशी जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना (शिंदे गट) पक्षात मोठा राजकीय तणाव निर्माण झाला असून, अधिकृत उमेदवार म्हणून निश्चित मानल्या जाणाऱ्या श्रेयाली गवस यांना ऐनवेळी AB फॉर्म नाकारण्यात आल्याने स्थानिक शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी उसळली आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या निर्णायक टप्प्यावर घेतलेल्या या धक्कादायक निर्णयामुळे शिवसेनेची संघटनात्मक पकड डळमळीत झाल्याचे चित्र साटेली भेडशी परिसरात स्पष्टपणे दिसून येत आहे. या प्रकरणावर शिवसेना (शिंदे गट) उपजिल्हा प्रमुख शैलेश दळवी यांनी उघड नाराजी व्यक्त करत “पुढील दिशा लवकरच स्पष्ट करू” असा इशाराच दिला आहे.
साटेली भेडशी जिल्हा परिषद मतदारसंघ हा मागील निवडणुकीत शिवसेनेकडे होता. सध्या येथे शिवसेनेचे सिटिंग सदस्य कार्यरत आहेत. महायुतीतील जागावाटपातही ही जागा शिवसेनाच्याच वाट्याला असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे याच मतदारसंघातून शिवसेनेचाच उमेदवार राहणार, हे जवळपास निश्चित मानले जात होते.
स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना श्रेयाली गवस यांनाच उमेदवारी मिळणार असा शब्द दिला होता. मात्र, जागा मिळाल्यानंतर पडद्यामागे घडलेल्या राजकीय हालचालींमुळे संपूर्ण चित्र अचानक बदलले. साटेली भेडशीची जागा डावलून शिवसेनेला मणेरी जिल्हा परिषद मतदारसंघ देण्यात आल्याचे समोर आले, आणि साटेली भेडशीतील उमेदवारी अक्षरशः काढून घेण्यात आली.या अनपेक्षित निर्णयामुळे साटेली भेडशीतील शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, “आमच्याशी अन्याय झाला” अशी भावना उघडपणे व्यक्त केली जात आहे.
या संदर्भात बोलताना उपजिल्हा प्रमुख शैलेश दळवी यांनी जिल्हा व तालुका नेतृत्वावर थेट बोट ठेवले.
“साटेली भेडशी जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेनेचे संघटन मजबूत आहे. सिटिंग सदस्य असताना शेवटच्या क्षणी उमेदवारी काढून घेणे हे कार्यकर्त्यांच्या मनोबलावर घाला घालणारे आहे. वरिष्ठांनी दिलेला शब्द पाळला गेला नाही, ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया त्यांनी दिली.
दरम्यान, या घडामोडींनंतर साटेली भेडशी परिसरात शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता, संभ्रम आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक कार्यकर्ते उघडपणे नाराजी व्यक्त करत असून, पुढील राजकीय भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.शैलेश दळवी यांनी “पुढील दिशा लवकरच जाहीर करू” असे स्पष्ट संकेत दिल्याने, येत्या काही दिवसांत साटेली भेडशी जिल्हा परिषद मतदारसंघात मोठे राजकीय बदल घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या घडामोडींमुळे जिल्हा परिषद निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलणार का?आणि शिवसेनेतील अंतर्गत नाराजीचा थेट फटका महायुतीला बसणार का?
याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले गेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!