कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

“मटका बंद केला म्हणतात, पण तिकीट मटक्यवाल्यांनाच!” — संजू परबांचा सडेतोड हल्ला*

*“मटका बंद केला म्हणतात, पण तिकीट मटक्यवाल्यांनाच!” — संजू परबांचा सडेतोड हल्ला*

*“विकास फक्त दीपक केसरकर करू शकतात; बाकीचं सगळं ढोंग”*

सावंतवाडी नगरपरिषद निवडणूक अंतिम टप्प्यात आली असताना शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आज पत्रकार परिषदेत सडेतोड प्रहार करत भाजपवर कठोर टीका केली.
“मटका बंद केला म्हणून सांगणाऱ्यांनी मटक्यांच्या व्यवहारात गुन्हा असलेल्या लोकांना तिकीट दिलं! मग सावंतवाडीत शहराचा विकास होणार की मटक्याचा?” असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला.
*केसरकरच विकास करू शकतात — संजू परबांचा दावा*
परब म्हणाले,“विकास करायची ताकद एकच — दीपक केसरकर. जनता स्थानिकांचा आवाज ऐकते. मराठी बोलणाऱ्यालाच सावंतवाडी निवडते. हीच सावंतवाडीकरांची संस्कृती आहे.”
*“युवराजांनी आधी २००३ अभ्यासावा; बालीश वक्तव्य थांबवावीत”*
भाजपकडून आयोजित पत्रकार परिषदेत युवराजांनी केलेल्या वक्तव्यांवरही त्यांनी टीका केली.
“२००३ ला आमदार कोण होते हे पाहावं. राजकारणात नवीन असूनही बालीश वक्तव्यं केली जात आहेत. तलाव वाचवायचा असेल तर भाजपला मतदान करू नका.”
संजू परबांनी गंभीर आरोप करत सांगितलं की—
“कॉलेज मैदान विकून टाकलं. पैशासाठी काहीही करतात. मुलांचं नुकसान करू शकतात.
तलावाशेजारील जागेचा व्यवहार करून इमारत उभी केली. माझंही ऑफिस तिथंच आहे. शिवराम राजेंनी दानधर्म केला; त्यानंतर कुणी काहीच केलं नाही.”
*निलेश राणे प्रकरणात जनता जाणते कुणाचं नाव आहे”*
निलेश राणेंवर दाखल झालेल्या गुन्ह्याबद्दल बोलताना त्यांनी स्पष्ट म्हटलं—“गुन्हा कोण करतं आणि कोण घडवून आणतं हे जनता ओळखते. आम्ही राणेंच्या सोबत आहोत. असे गुन्हे दाखल करून आम्ही घाबरणार नाही—उलट पेटून उठतो. पराभव निश्चित करून दाखवू.”
*“भाजपचेच कार्यकर्ते सांगतात—वरच मत देऊ नका”*
भाजप युवा नेते विशाल परब यांच्या नावाने सुरु असलेल्या प्रचाराबाबत संजू परब यांनी गौप्यस्फोट केला—“त्यांचेच कार्यकर्ते सांगतात, ‘वरच मत देऊ नका’. आमदारकीला धोका नको म्हणून त्यांनी हा प्रचार सुरू केला आहे. आजपासून हा मोहीम राबवत आहेत. हवं तर पोलिसांकडून चौकशी करून बघा.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!