कोकणमहाराष्ट्रसंपादकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

*”सिंधुदुर्ग पोलिसांचा गड झोपेत?… गावागावात मटका, दारू, गांजाचा उच्छाद!”*

*”सिंधुदुर्ग पोलिसांचा गड झोपेत?… गावागावात मटका, दारू, गांजाचा उच्छाद!”*

*नशेडे,गांजाडे, झाले सैरभैर, तात्पुरती कारवाई करुन जनतेच्या डोळ्यात धूळफेक नको*

सिंधुदुर्ग –
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गल्लोगल्ली आणि चौकाचौकात जे चाललंय, ते कोणाच्या नजरेतून सुटलंय? पोलीस प्रशासनाच्या? की त्यांनी जाणूनबुजून डोळे मिटलेत?अलीकडे पोलिसांच्या धडक कारवाईनंतर काही काळ गांजाडे सैरभैर झाले, सिगारेटचा हब सामसूम झाला. हिरवे नेटमध्ये चालणारी काळी कृत्ये थांबली. पण प्रश्न आहे—हे कायमचं थांबणार का, की पुन्हा जुन्या चाळ्यात परतणार?
*शाळा–रुग्णालय परिसरात सिगारेट?*
शाळा, कॉलेज, रुग्णालय, बसस्थानक याठिकाणी उघडपणे तंबाखूजन्य पदार्थ विकले जातात. नियम काय सांगतात, आणि प्रत्यक्षात काय होतंय, यात आकाश–पाताळाचा फरक आहे. युवकांना उघड्यावर धुम्रपान करताना पकडून काही कारवाई केली, एवढ्यावर पोलिसांचं कर्तव्य संपतं का?
*विषारी दारूचा सापळा*
गोव्यात १० रुपयांना मिळणारी बनावटी दारू सिंधुदुर्गात ५० रुपयांना विकली जाते. त्यात अल्कोहोलचे प्रमाण पाचपट जास्त! ही दारू पिऊन ३५–५० वयोगटातील कित्येक पुरुष एका वर्षात लिव्हर निकामी होऊन मरतात. त्यांच्या बायका विधवा होतात, कुटुंब उद्ध्वस्त होतं. “म्हातारी मेल्याचं दुःख नाही; काळ सोकावतोय हे खरं!”—ही परिस्थिती यासाठीच आहे.
प्रश्न असा, पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय हे अड्डे इतके बिनधास्त चालू शकतात का?
*मटका – गावोगावाचा कर्करोग*
प्रत्येक गावात मटका, जुगार, दारू, गुटखा याचे अड्डे पोलिसांच्या माहितीशिवाय कसे चालतात? गावचे पोलिस पाटील, बीट अंमलदार काय करतात? जबाबदारी ठरवा! जबाबदारी टाळली, तर त्यांच्यावरच कारवाई करा.
*नाके तपासणी – पैसे गोळा करण्यासाठी?*
नाक्या–नाक्यावर तपासणी नाके आहेत, पण ती कार्यवाहीसाठी की वसूलीसाठी? जर अंमली पदार्थ, दारू, जुगार थांबत नाही, तर मग हे नाके कशासाठी? फक्त पैशाच्या गळतीसाठी
*निर्वाणीचा इशारा*
लोक आता मौन बाळगणार नाहीत. पोलिसांनी गस्त वाढवली नाही, अड्डे उध्वस्त केले नाहीत, तर गावकरीच थेट पालकमंत्र्यांकडे यादी देणार. पोलिसांना ठरवावं लागेल—आपली नोकरी वाचवायची की दोन नंबरवाल्यांचं बॅकअप घ्यायचं!
*अग्रलेखाचा निष्कर्ष:*
सिंधुदुर्गातील युवक, महिला आणि समाज उद्ध्वस्त करणाऱ्या या अवैध धंद्यांच्या मुळाशी पोलिसांचा निष्क्रियपणा आहे. जनता आता सजग झाली आहे. पोलिसांनी आता झोपेचे सोंग बंद करून खऱ्या अर्थाने कारवाई सुरू केली, तरच समाज वाचेल. अन्यथा ही निष्क्रियता लवकरच पोलिसांनाच महागात पडेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!