चौकुळमध्ये पर्यटनाच्या नावाखाली धिंगाणा; ग्रामस्थ संतप्त
चौकुळमध्ये पर्यटनाच्या नावाखाली धिंगाणा; ग्रामस्थ संतप्त
दारूच्या बाटल्या, कचऱ्याचा खच अन् ग्रामस्थांशी हुज्जत; दंडुके घेऊन पर्यटक रस्त्यावर उतरल्याचा आरोप
पोलिस, वन विभागाच्या कारवाईची मागणी; उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलनाचा ग्रामस्थांचा इशारा
चौकुळ : शांतताप्रिय आणि निसर्गसंपन्न अशी ओळख असलेल्या चौकुळ गावाला सध्या पावसाळी पर्यटनामुळे गालबोट लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. कुंभवडे येथील प्रसिद्ध बाबा धबधब्याकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून, पर्यटनाच्या नावाखाली काही पर्यटकांकडून रस्त्याच्या दुतर्फा मद्यपान, धिंगाणा, कचरा आणि स्थानिकांना त्रास देण्याचे प्रकार होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
शिरगांवकर पॉईंट ते बाबा धबधबा या मार्गावर अनेक पर्यटकांकडून रस्त्याच्या कडेला मद्यपान करून धिंगाणा घातला जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. भोजन केल्यानंतर दारूच्या बाटल्या, प्लास्टिकच्या बाटल्या, यूज-अँड-थ्रो प्लेट्स आणि इतर कचरा रस्त्याच्या दुतर्फा टाकला जात असल्याने परिसराचे विद्रुपीकरण होत आहे. काही ठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या महिलांशी छेडछाडीचे प्रकारही घडत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
वाहन बंद पडले अन् दंडुके घेऊन तरुण रस्त्यावर!
रविवारी केगदवाडी येथील उतारावर एक वाहन बंद पडल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी केगदवाडीतील ग्रामस्थ पुढे आले असता, एका वाहनातील काही तरुणांनी वाहनातून दंडुके आणि इतर काही हत्यारे घेऊन खाली उतरत ग्रामस्थांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यावेळी पोलिस पाटील समीक्षा सुनील गावडे या घटनास्थळी उपस्थित होत्या. त्यांनी या प्रकाराबाबत जाब विचारला असता संबंधित तरुणांनी तेथून काढता पाय घेतल्याचे सांगण्यात आले.
“हा प्रकार अत्यंत भयंकर आहे. पर्यटनाच्या नावाखाली स्थानिक ग्रामस्थांनाच भीतीच्या वातावरणात जगावे लागणार असेल, तर हे पर्यटन कोणाच्या हिताचे?” असा सवाल पोलिस पाटील समीक्षा गावडे यांनी उपस्थित केला आहे.
आंबोलीप्रमाणे चौकुळमध्येही पोलिस बंदोबस्ताची मागणी
चौकुळमधील वाढती पर्यटकांची गर्दी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या लक्षात घेता, आंबोली परिसरातील प्रमुख ठिकाणांप्रमाणे चौकुळमधील महत्त्वाच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त आणि गस्ती पथक तैनात करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पर्यटकांच्या वाहनांची तपासणी करून वाहनांमध्ये आढळणारे बेकायदेशीर शस्त्रसदृश साहित्य तसेच मद्याच्या बाटल्या जप्त करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. पोलिसांनी भरारी पथकांच्या माध्यमातून संवेदनशील ठिकाणी अचानक तपासणी करून सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
वन विभागानेही डोळेझाक करू नये!
चौकुळ परिसरातील वनक्षेत्र आणि निसर्गसंपदेचे संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या वन विभागानेही या प्रकारांकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
वनक्षेत्रात मद्यपान, कचरा करणे तसेच निसर्गाची नासधूस करणाऱ्या पर्यटकांवर कारवाई होत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. विशेषतः थार जीपमधून येणाऱ्या काही पर्यटकांकडून वनक्षेत्रात नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला असून, अशा वाहनांवर वन विभागाने लक्ष ठेवावे, अशी मागणी आहे.
वन विभागाने स्वतंत्र गस्ती पथके पाठवून वनक्षेत्रात मद्यपान करणारे, कचरा टाकणारे आणि निसर्गसंपदेची नासधूस करणारे पर्यटक आढळल्यास त्यांच्यावर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
“आम्हालाच आमच्या गावात फिरण्याची भीती!”
पर्यटनामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळावी, पर्यटकांनी गावात यावे, याला ग्रामस्थांचा विरोध नाही. मात्र पर्यटनाच्या नावाखाली अनागोंदी, मद्यपान, कचरा, वाहतूक कोंडी आणि दहशतीचे वातावरण निर्माण होत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा संतप्त इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
“आम्हालाच आता आमच्या गावातील रस्त्यावरून फिरताना वाहनांची भीती वाटते. त्यात मद्यधुंद पर्यटकांचीही भीती वाटू लागली आहे. आमच्या गावात आम्ही सुरक्षित नसू, तर या पर्यटनाचा उपयोग काय?” असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
कारवाई नाही तर आंदोलन!
ग्रामपंचायत स्तरापासून पोलिस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पत्रव्यवहार करूनही अपेक्षित उपाययोजना होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पर्यटनाच्या नावाखाली सुरू असलेला हा धिंगाणा तातडीने थांबवावा आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांवर कठोर कारवाई करावी, अशी एकमुखी मागणी होत आहे.
दरम्यान, परिस्थितीत तातडीने सुधारणा झाली नाही आणि प्रशासनाने ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर चौकुळ ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
ग्रामस्थांनी पर्यटनाला विरोध नसल्याचे स्पष्ट करताना, “निसर्ग वाचवा, गावाचा सन्मान राखा आणि नियम पाळून पर्यटन करा; अन्यथा अनागोंदी पर्यटनाला चौकुळमध्ये थारा दिला जाणार नाही,” असा स्पष्ट संदेश दिला आहे.तसेच जर हा प्रकार थांबला नाही तर रविवारी पर्यटकाना चौकुळ गाव बंद करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

