झोळंबे शाळेत रानभाजी प्रदर्शन व पाककृती स्पर्धा उत्साहात संपन्न
झोळंबे शाळेत रानभाजी प्रदर्शन व पाककृती स्पर्धा उत्साहात संपन्न
विद्यार्थ्यांमध्ये पोषण, आरोग्य व स्थानिक अन्नसंस्कृतीबाबत जागृती
झोळंबे (ता. दोडामार्ग), ४ ऑगस्ट –
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, झोळंबे येथे रानभाजी प्रदर्शन व पाककृती स्पर्धेचे आयोजन सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडले. या उपक्रमात विद्यार्थ्यांसह पालकांचा देखील उत्स्फूर्त सहभाग लाभला. स्थानिक व औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांचे आकर्षक प्रदर्शन आणि त्यावर आधारित विविध चविष्ट पाककृतींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
या उपक्रमात पालकांनी विविध रानभाज्या शाळेत सादर करत त्यांचे औषधी व पोषणमूल्ये विषद केली. पाककृती स्पर्धेत सहभाग घेऊन त्यांनी पारंपरिक पद्धतीने तयार केलेले पदार्थ विद्यार्थ्यांना चाखायला दिले. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्थानिक अन्नसंस्कृतीचा अनुभव घेता आला.
या कार्यक्रमात बोलताना शिक्षक संतोष गवस यांनी रानभाज्यांचे आरोग्यदायी महत्त्व समजावून सांगितले. “आजच्या जीवनशैलीत रानभाज्यांचे पुनर्मूल्यांकन गरजेचे आहे,” असे ते म्हणाले. मुख्याध्यापक प्रवीण देसाई यांनी आपल्या बालपणीच्या आठवणी शेअर करत विद्यार्थ्यांना नैसर्गिक अन्नाच्या फायद्यांबाबत जागरूक केले.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते ग्रामस्थ सिताबाई गवस आजींचे अनुभव कथन. त्यांनी पारंपरिक पद्धतीने रानभाज्या कशा शोधल्या जात असत, त्या कशा वापरल्या जात आणि त्याकाळी आहारात त्यांचे स्थान काय होते, याचे रसाळ वर्णन केले.
ग्रामपंचायत सदस्या संजना गवस यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना, “रानभाज्या म्हणजे केवळ खाण्याचा भाग नसून ती आपल्या संस्कृतीची शिदोरी आहे,” असे सांगत अशा नैसर्गिक अन्नाचा नियमित आहारात समावेश करण्याचे आवाहन केले.
हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये पोषणविषयक जागरूकता, स्थानिक अन्नसंस्कृतीबाबत अभिमान व आरोग्याची जाणीव निर्माण करणारा ठरला.
कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्या संजना गवस, मुख्याध्यापक प्रवीण देसाई, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा दीक्षा घोगळे, शिक्षक संतोष गवस, विशाल माने, दिनेश जाधव, भाग्यश्री गवस, विशाखा गवस, शुभ्रा झोरे, सीताबाई गवस तसेच सर्व विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

