.पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मला धमक्या देण्याच्या भानगडीत पडू नये -परशुराम उपरकर.
.पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मला धमक्या देण्याच्या भानगडीत पडू नये -परशुराम उपरकर.
मी राणे कुटुंबियांना पुरून उरलो तर तुम्ही कोण आहात..मी धमक्यांना भीक घालत नाही
कणकवली, हि ०१: मला रवी चव्हाण म्हणतात माझ्याशी गाठ आहे.. तुम्हाला बघून घेईन.. अशा धमक्या पालकमंत्र्यांनी मला देऊ नयेत मी राणेंच्या धमक्यांना भीक घातली नाही तर तुम्ही कोण आहात, तुम्ही दादा भाई असाल.. पण आम्हीही मुंबईला होतो हे लक्षात ठेवा असा प्रतिइशारा माजी आमदार परशूराम उपरकर यांनी आज येथे दिला. तसेच पालकमंत्र्यांचे पीए अनिकेत पटवर्धन याचे बँक अकाऊंट डिटेल देण्यापेक्षा त्याच्या मोबाईलचे सीडीआर जाहीर करा असेही ते म्हणाले.
येथील आपल्या संपर्क कार्यालयात श्री. उपरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, सिंधुदुर्गातील जनतेच्या हितासाठी आम्ही आवाज उठवत आहोत. तसेच पालकमंत्र्यांच्या पीएची अरेरावी देखील आम्ही सातत्यांने सर्वांपुढे मांडत आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम खात्यामधील भ्रष्टाचाराविरोधात सातत्याने आवाज उठवत आहोत. त्यावरून चिडलेल्या पालकमंत्र्यांनी नुकतीच मला बघून घेईन. माझ्याशी गाठ आहे अशी धमकी दिली आहे. पण अशा धमक्यांना मी घाबरत नाही. आतापर्यंत, राणे माझ्याशी भांडता भांडता म्हातारे झाले. तर तुम्ही काय आहात. तसेच फार फार तर तुम्ही काय कराल तर मला मारून टाकाल. पण मी त्यालाही घाबरत नाही. त्यामुळे फुकाच्या धमक्या देऊ नयेत.
उपरकर म्हणाले, छत्रपतींचा पुतळ्यामधील भ्रष्टाचार बाहेर काढायचा असेल तर पालकमंत्र्यांचा पीए अनिकेत पटवर्धन याचे बँक अकाऊंट डिटेल देऊन काहीही उपयोग नाही. कारण कुठलाही राजकारणी, त्याचा पीए आपल्या खात्यावर पैसे घेत नाही. या भ्रष्टाचाराचा उलगडा करायचा असेल तर अनिकेत पटवर्धन याच्या मोबाईलचे डिटेल जाहीर करावेत. जेणे करून त्यांच्यामध्ये आणि पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे तसेच बांधकाम अधिकाऱ्यांमध्ये कितीवेळा संभाषण झाले हे समजून येईल.
श्री. उपरकर म्हणाले, शासन एका बाजूला महिलांच्या सन्मानासाठी लाडकी बहीण योजना जाहीर करते. तर दुसऱ्या बाजूला पालकमंत्र्यांचे पीए एका महिला अधिकाऱ्याला अर्वाच्च भाषेत धमकी देतात. पटवर्धन हा काही शासकीय अधिकारी नाही. तरीही तो महिला अधिकाऱ्याला टोचून का बोलतो. इतर शासकीय अधिकाऱ्यांवरही त्याची अरेरावी का असते याचेही उत्तर पालकमंत्र्यांनी द्यावे.
गुजरात मध्ये सरदार पटेल यांचा पुतळा बनविण्यासाठी अडीच ते तीन वर्षाचा कालावधी लागला. त्याच धर्तीवर राजकोट येथे छत्रपतींचा पुतळा उभा रहायला हवा. या पुतळ्याचे काम घाईगबडीत होता नये यासाठीच आम्ही सातत्याने आवाज उठवत आहोत. त्याअनुषंगाने आम्हाला कोणी धमकी देत असेल तरी आमचा आवाज बंद होणार नाही.

