कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

अक्षय साईल आत्महत्या प्रकरणी दोघे संशयित ताब्यात*

*अक्षय साईल आत्महत्या प्रकरणी दोघे संशयित ताब्यात*

*दोघांनाही दोन दिवसांची पोलीस कोठडी*

सावंतवाडी । प्रतिनिधी :
कोलगाव भोम येथील अक्षय साईल याच्या आत्महत्ये प्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी शुक्रवारी दोन जणांना ताब्यात घेतले. प्रशांत भालचंद्र पडते व प्रथमेश प्रशांत पडते (दोघेही राहणार कोलगाव भोम) यांना अटक करुन कुडाळ येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना ९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान यातील उर्वरित दहा आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहेत मात्र ते फरार झाले असल्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सांगितले.
कोलगाव येथील अक्षय साईल याने गाडी मालक व काही युवकांनी गाडीच्या पैशांवरुन सातत्याने तगादा लावल्याच्या कारणावरून माडखोल येथील धरणात आत्महत्या केली होती. ज्या युवकांनी गाडी फिरण्यासाठी नेली होती त्यानी त्या गाडीचा अपघात केला होता त्यामुळे गाडी मालकाचे मोठे नुकसान झाले होते. मयत अक्षय याने संशयित व ओळखीचे असलेले भालचंद्र पडते यांच्या सांगण्यावरून आपल्या ओळखीने ती गाडी पर्यटनासाठी ठरवून दिली होती. मात्र अपघात झाल्यानंतर गाडी मालकाने अक्षय यालाच जबाबदार धरत त्याच्याकडे भरपाई पोटी साडे सात लाख रुपयांची मागणी केली. सतत पैश्यावरून अक्षय याला ब्लॅकमेल केले जात होते धमकी दिली जात होती. शिवाय त्याच्या घरी ही जाऊन त्याला सतावण्याचे प्रकार सुरुच होते. याला कंटाळून अक्षय याने गाडी मालक याला साडे पाच लाख रुपये स्वतःकडील नेऊन दिले व वरील पैसे आपलाकडे नसल्याचे सांगत आपण अपघात केला नसून ज्यांनी केला त्याच्याकडून घेण्यात यावेत असे सांगितले. त्याचा राग मनात धरून संशयित दहा ते बारा जणानी आत्महत्येपूर्वी अक्षयला दोन दिवस अगोदर बेदम मारहाण केली होती.
त्यांनतर तो घराबाहेर पडला नाही त्याच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली होती. या मारहाणी मुळे नैराश्य आल्याने अक्षय साईल याने चिठ्ठी लिहून ठेवत त्यात नऊ जणांचा उल्लेख केला. या लोकांमुळे आपणास नाहक त्रास होत असून त्यांच्यामुळे मी आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येस हेच लोक जबाबदार आहेत त्यांना देण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. आपण या सर्वाना त्यांच्या पापाची शिक्षा द्यावी असा उल्लेख करुन तो घरातून निघून गेला होता तो थेट माडखोल धरणात जाऊन त्याने दुचाकी लाऊन चप्पल काढून मोबाईल फेकत उडीच घेतली. जी चिठ्ठी त्याने लिहिली होती ती त्याने सर्व संशयित यांना पाठवली होती व आपल्या मोबाईल वर स्टेटस देखील ठेवला होता त्यामुळे अक्षय आत्महत्या करण्यासाठी जात असल्याचे स्पष्ट झाले व त्याची सगळीकडे शोधाशोध सुरु झाली.
अक्षय याचे वडील जनार्दन साईल यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून चिठठीमध्ये नमुद असलेल्या परवेज शेख, अजित बाळकृष्ण मठकर, सलीम सययद,
तेजस पोतदार, परवेजचे बाबा, संकेत माळी, श्यामु नामक, भालचंद्र प्रशांत पडते, प्रशांत पवार, प्रणय प्रशांत पडते, एक महिला, व अन्य एक जण मिळून एकूण तेरा संशयीतांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्हयाप्रकरणी संशयित याना तातडीने अटक करा अशी मागणी कोलगाव ग्रामस्थानी लावून धरली होती. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने प्रशांत पडते व प्रथमेश पडते या दोघांना तात्काळ ताब्यात घेतले होते. त्यांना शुक्रवारी अटक करुन कुडाळ येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. पोलिसांनी अन्य संशयीत यांच्या घरी शोध घेतला मात्र ते आढळून आले नाहीत. उर्वरित सर्व संशयित फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सरदार पाटील करत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!