सावंतवाडी ३ ऑगस्ट रोजी भाजपचे विस्तारीत अधिवेशन
सावंतवाडी ३ ऑगस्ट रोजी भाजपचे विस्तारीत अधिवेशन
खा. नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा होणार नागरी सत्कार
सावंतवाडी । प्रतिनिधी :
लोकसभा निवडणुकीत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीने
पुन्हा एकदा अभूतपूर्व यश मिळविले. विरोधकांचे सर्व दावे फोल ठरवित मोदींचे तिसरे पर्व सुरु झाले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यामध्ये मात्र पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी अलीकडेच पुणे येथे झालेल्या भाजपच्या राज्यस्तरीय अधिवेशनात प्रत्येक जिल्ह्यात विस्तारित अधिवेशन घेण्याचे ठरले. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा भाजपचे विस्तारित अधिवेशन सावंतवाडी शहरातील बॅरिस्टर नाथ पै सभागृहात ३ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे. या अधिवेशनात प्रदेशचा एक नेता तसेच माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील,आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार यांसह भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली.
दरम्यान, या अधिवेशनात लोकसभा निवडणुकीतील विजयी उमेदवार खासदार नारायण राणे तसेच अलीकडेच झालेल्या निवडणुकांमध्ये कोकणची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचाही नागरी सत्कार करण्यात येणार असून या अधिवेशनात भाजपचे एक हजारहून अधिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहतील असेही त्यांनी स्पष्ट केले.
सावंतवाडी येथील भाजपा कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख माजी आमदार राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा उपाध्यक्ष संजू परब, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, युवा मोर्चा राज्य उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोंसले, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, आंबोली मंडल अध्यक्ष रवि मडगांवकर, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे,दोडामार्ग मंडल अध्यक्ष सुधीर दळवी,वेंगुर्ले मंडल अध्यक्ष सुहास गवंडळकर आदी उपस्थित होते.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अलीकडेच पुणे येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीचे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव यांसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्रातील ९ हजार हून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्रातीलप्रत्येक जिल्ह्यात तसेच प्रत्येक मंडळात भाजपचे विस्तारित अधिवेशन घेऊन कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा संकल्प करण्यात आला. या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन होत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
त्या अधिवेशनात भाजपचे सर्व जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी, सर्व मंडळाचे पदाधिकारी, सहकारातील सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी भाजप तर्फे राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांबाबत चर्चा होणार असून काही अभिनंदन असे ठराव देखील घेण्यात येणार आहेत. तसेच वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन देखील होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच हे अधिवेशन संपन्न झाल्यानंतर प्रत्येक मंडळ निहाय विस्तारित अधिवेशन देखील होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ९१८ बुथवर भारतीय जनता पार्टी म्हणून आमची तयारी पूर्ण झाली आहे. शतप्रतिशत भाजप हा आमचा पूर्वीपासूनचा नारा आहे. देशापासून ते स्थानिक स्वराज्य संस्था पर्यंत भाजपला यश प्राप्त व्हावं ही आमची नेहमीच भूमिका राहिली आहे. मात्र, विधानसभा निवडणूक महायुती म्हणूनच होणार असून उमेदवार कोण असावा याबाबत वरिष्ठ निर्णय घेतील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.