कौशल्य विकास केंद्रातर्फे स्पर्धा परीक्षा ग्रंथालय लाभ घेण्याचे आवाहन
कौशल्य विकास केंद्रातर्फे स्पर्धा परीक्षा ग्रंथालय लाभ घेण्याचे आवाहन
प्रतिनिधी
सिंधुदुर्गनगरी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग यांच्या मार्फत जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याकरिता सुसज्ज ग्रंथालय उपलब्ध आहे. सदर ग्रंथालयात युपीएससी, एमपीएससी, सरळ सेवा, पोलीस भरती यांसारख्या विविध स्पर्धा परीक्षेची पुस्तके उपलब्ध आहेत. सदर ग्रंथालय सेवेचा निःशुल्क लाभ इच्छुक उमेदवार घेऊ शकतात, अशी माहिती सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग यांनी दिली.
विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी सुसज्ज व अद्यावत हॉल, स्वच्छ व शांत वातावरण, मुलींसाठी स्वतंत्र अभ्यास कक्ष, ग्रुप स्टडीसाठी कक्ष, स्पर्धा परीक्षेची पुस्तके, अनुभवी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, नामांकित वर्तमानपत्रे व मासिके, संगणक सुविधा, वाय-फाय सुविधा उपलब्ध आहेत.
अभ्यासिकेत प्रवेश घेण्याकरिता सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग प्रशासकीय संकुल, तळमजला, ब्लॉक-अ, ०२३६२-२२८८३५ येथे संपर्क साधावा, असे आवाहन कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

