गोगटे-वाळके महाविद्यालयात सामाजिक शास्त्र विभागाच्या वतीने राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न
गोगटे-वाळके महाविद्यालयात सामाजिक शास्त्र विभागाच्या वतीने राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न
बांदा:प्रतिनिधी:शैलेश गवस
भारत कृषीप्रधान देश असूनही शेतीसाठी आवश्यक पायाभूत सुविधांची कमतरता दिसून येते. कोरोना महामारीच्या काळात कृषी क्षेत्रानेच देशाच्या अर्थव्यवस्थेला सावरले असून शेती क्षेत्रात आवश्यक पायाभूत सुविधा प्राप्त न झाल्यामुळे विकसित देशांच्या तुलनेत आजही आपला देश मागासलेला दिसून येतो.देशाच्या अर्थव्यवस्थेत आजही शेती क्षेत्राला महत्त्वपूर्ण स्थान आहे असे प्रतिपादन सामाजिक शास्त्र विभागाच्या वतीने आयोजित चर्चासत्रात प्राचार्य सुभाष सावंत यांनी केले.
येथील गोगटे वाळके महाविद्यालयाच्या सामाजिक शास्त्र विभागाच्या वतीने ‘कोरोना महामारी नंतरच्या काळातील सामाजिक,आर्थिक व राजकीय स्थिती’ या विषयावर एक दिवशीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.या चर्चासत्राचे बीजभाषक म्हणून दोडामार्ग येथील लक्ष्मीबाई हळबे महाविद्यालयाचे प्राचार्य सुभाष सावंत होते.प्राचार्य सावंत पुढे म्हणाले की,अमेरिका हा देश विकसित असूनही कोरोना महामारीच्या काळात या देशातील मृत्यूचे प्रमाण जास्त होते.वैद्यकीय क्षेत्रात प्रगत असूनही या देशाला कोरोना महामारीच्या काळात अनेक संकटांना सामोरे जावे लागले. म्हणूनच इतर क्षेत्रातील विकासाबरोबरच शेती क्षेत्रालाही प्राधान्य देणे फार गरजेचे आहे.
महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि ग्रंथालय विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्राला महाराष्ट्र आणि गोवा राज्यातून आलेल्या संशोधकांनी आपले शोधनिबंध सादर केले.दिवसभर चाललेल्या या चर्चासत्रात कोरोना महामारीनंतरच्या काळातील सामाजिक,आर्थिक, राजकीय आणि वैद्यकीय बदलांच्या बाबतीत चर्चा झाली. शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गोविंद काजरेकर यांनी हे चर्चासत्र यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. चर्चासत्राचे आयोजन करण्यासाठी मुख्य समन्वयक प्रा.रश्मी काजरेकर प्रा.ए.ए. शिर्के,प्रा.डॉ.एस. पी.वेल्हाळ,प्रा.डॉ. के.के.म्हेत्री,प्रा. डॉ.एम.एन. वालावलकर आणि प्रा.प्रसाद जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.

