कणकवली तहसीलदार कार्यालयात मुद्रांक खरेदी करण्यासाठी करावी लागतेय तारेवरची कसरत

सर्वसामान्याची  होत आहे  गैरसोय.. मात्र अधिकारी करताहेत डोळेझाक

प्रतिनिधी – रविकांत जाधव

कणकवली –  येथील तहसीलदार कार्यालयातील सर्व मुद्रांक विक्रेत्यांकडे पुरेसे मुद्रांक उपलब्ध असतात. एकाच मुद्रांक विक्रेत्याकडे मुद्रांक खरेदीसाठी अनावश्यक गर्दी करू नये मुद्रांक विक्रेत्यांना मुद्रांक उपलब्ध करून न दिल्यास दुय्यम निबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा” हे आवाहन केले आहे कणकवली दुय्यम निबंध यांनी. अशा आशयाचा फलक दुय्यम निबंधक कार्यालया बाहेर मुद्रांक विक्रेते बसतात त्याच्या मागे लावलेला आहे. पण हा फलक फक्त नावापुरताच राहिलेला आहे. वस्तुस्थिती पाहता आजही एकाच मुद्रांक विक्रेत्याकडे मुद्रांक उपलब्ध असल्यामुळे मुद्रांक खरेदीसाठी सोमवारी रांग लागली होती. हे आता नेहमीच झालेला आहे.तासंतास थांबल्या नंतरही आवश्यक असलेल्या किमतीचा मुद्रांक मिळेल याचीही शाश्वती नाही. त्यामुळे जनतेच्या होणाऱ्या गैरसोयी बाबत लक्ष द्यायला कुणालाच वेळ नाही का. ज्या ठिकाणी फलक लावण्यात आला आहे तेथेच दुय्यम निबंधक कार्यालय असून देखील याकडे डोळेझाक होत आहे. त्यामुळे मुद्रांक विक्रेत्यांच्या या मुजोरीला आता आवर कोण घालणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. कणकवली तहसील कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालया बाहेर असणाऱ्या मुद्रांक विक्रेत्यांकडे मुद्रांक उपलब्ध होत नसतील तर त्यांना खाजगी दुकाने सुरू करण्यासाठी जागा देण्यात आली आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे . महिन्याभरापूर्वी हा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर तात्पुरती उपाययोजना करण्यात आली. मात्र त्यानंतरही दुय्यम निबंधक यांचा कारवाईचा इशारा या मुद्रांक विक्रेत्यांनी धुडकावून लावला. एकीकडे ही मनमानी सुरू असतानाच काही मुद्रांक विक्रेत्यांकडून एका बॉंड पेपर मागे दहा रुपये जादा घेतले जात असल्याची तक्रार कणकवली तहसीलदारांकडे दाखल झाली आहे. मूळ किमतीपेक्षा जास्त दराने मुद्रांक विक्री करणाऱ्या परवानाधारक मुद्रांक विक्रेत्यांवर कारवाईस टाळाटाळ करण्यामागची कारणे काय असाही सवाल उपस्थित होत आहे. दुय्यम निबंधक कार्यालया बाहेरच जर अशाप्रकारे अनागोंदी कारभार सुरू असेल तर या मुद्रांक विक्रेत्यांवर अंकुश ठेवण्यासाठी कोणीच वाली उरला नाही का?मुद्रांक विक्रेत्यांकडे परवाना असूनही ते जनतेसाठी मुद्रांक उपलब्ध करून देत नसतील तर यापूर्वी परवाना रद्द करण्याचा नोटिसा देऊनही त्याची साधी दखलही मुद्रांक विक्रेते घेत नसतील तर सर्वसामान्य जनतेने न्याय कुणाकडे मागावा . एकीकडे कोरणा चा प्रादुर्भाव जिल्ह्यात आजही सुरू असताना मुद्रांक खरेदीसाठी शासकीय कार्यालयामध्ये होत असलेली गर्दी कोरणा संसर्ग कसा टाळणार असाही प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच जनतेच्या सोयीसाठी मुद्रांक विक्रेत्यांना तहसीलदार कार्यालयात बसण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली होती पण जर जनतेला मुद्रांक मिळतच नसतील तर मुद्रांक विक्रेत्यांना दुय्यम निबंधक कार्यालया बाहेर बसण्यासाठी जागा देऊन तरी उपयोग काय? सोमवारी मुद्रांक खरेदीसाठी रांगा लागत झुंबड उडाली होती. सदर बाब कणकवली तहसीलदार आर जे पवार यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने दुय्यम निबंधक यांना कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी असाच प्रकार होत असल्याने संबंधित मुद्रांक विक्रेत्यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतर आठवड्याभरात पुन्हा एकदा तसाच प्रकार सुरू झाल्याने या मुद्रांक विक्रेत्यांच्या मुजोरीला चाप लावण्याची मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!