ड्रग्जमुक्त सिंधुदुर्ग मोहीम तातडीने राबवा
ड्रग्जमुक्त सिंधुदुर्ग मोहीम तातडीने राबवा
नंदन वेंगुर्लेकर यांची केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रांकडे मागणी
वेंगुर्ले
सिंधुदुर्ग जिल्हयात आता चरस, गांजा, कोकेन व तत्सम अमली पदार्थ व्यवहाराचे लोण पसरू लागले आहे. त्यामुळे अनैतिक व्यवहारांना प्रोत्साहन मिळत असून प्रशासकीय यंत्रणेकडून याकडे हवे तसे लक्ष दिले जात नाही. जिल्हा पूर्णपणे अमली पदार्थाच्या विळख्यात सापडण्याआधी या बेकायदा व्यवहारांना आळा घालणे आवश्यक आहे. यासाठी ड्रग्जमुक्त सिंधुदुर्ग अभियान मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते नंदन वेंगुर्लेकर यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांना दिले आहे. नुकताच केंद्रीय मंत्री मिश्रा यांनी सिंधुदुर्ग दौरा केला. यादरम्यान सावंतवाडी येथे त्यांची भेट घेऊन नंदन वेंगुर्लेकर यांनी जिल्हयातील अमली पदार्थ व्यवहाराबाबतची वास्तवता त्यांच्यासमोर मांडली. कोणकोणत्या ठिकाणी असे अनैतिक व्यवहार चालतात याबाबतही त्यांनी मंत्र्यांशी चर्चा केली. जिल्हयातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी अमली पदार्थाच्या विळख्यात सापडत चालले असून ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे. त्यामुळे अमली पदार्थ व्यवहारांच्या ठिकाणांचा शोध घेऊन दोषींवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. जिल्हयात अमली पदार्थविरोधी जनजागृतीची शाळा-कॉलेजांमधून गरज असून शासनस्तरावर तसे नियोजन करण्यात यावे. प्रत्येक गावात ड्रग्जमुक्त मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी वेंगुर्लेकर त्यांनी केली. यावेळी माजी आमदार राजन तेली, मच्छीमार नेते वसंत तांडेल, साईप्रसाद नाईक उपस्थित होते.
