शाळांना पुरविण्यात आलेला शालेय पोषण आहार निकृष्ट
शाळांना पुरविण्यात आलेला शालेय पोषण आहार निकृष्ट
कणकवली
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत प्राथमिक शाळांना पुरविण्यात येणारे कडधान्य निकृष्ट दर्जाचे आहे, अशा तक्रारी अनेक शाळांकडून तालुकास्तरावर देण्यात आल्या आहेत. दरम्यान, अशा धान्याचा नमुना व तक्रार तालुकास्तरावर सादर करण्यास सांगण्यात आले असल्याचे समजते. मात्र, असे निकृष्ट धान्य बदलून कधी मिळणार? तोपर्यंत काय करायचे? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
शालेय पोषण आहार याजनेंतर्गत बहुतांशी शाळाना पुरविण्यात आलेले वाटाणे निकृष्ट दर्जाचे आहे. हे वाटाणे बाहेरून चांगले दिसत असले तरीही ते अजिबात शिजत नाहीत. तसेच त्यांना एक वेगळाच वास येत असल्याने विद्यार्थ्यांना ते कसे खायला द्यायचे असा सवाल उपस्थित केला जात आहे. मसुरडाळही निकृष्ट दर्जाची असल्याने शाळा पातळीवर मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी टोके असलेली डाळ नाकारण्यात आली. काही शाळांमध्ये अधिकाऱ्यांनी भेटी देऊन याबाबतची खातरजमाही केल्याचे समजते. मात्र, प्रत्यक्ष कार्यवाही कधी होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. निकृष्ट धान्यामुळे पालक शाळांमधील शिक्षकांकडे तक्रारी करीत असून शिक्षक व पालक यांच्यात त्यामुळे वाद होत आहेत. असा निकृष्ट वाटाण्याचा आहार आमच्या पाल्यांना देऊ नये, असे पालक थेट सांगत असल्याने शिक्षकही अडचणीत येत आहेत. दरम्यान, याबाबत अनेक शाळांनी तालुकास्तरांवर लक्ष वेधले आहे. यात अशा निकृष्ट धान्याचा नमुना व तक्रार तालुकास्तरावर देण्यास सांगण्यात आले असल्याचे समजते.

