डिगस येथे पावणेदोन लाखाची दारू जप्त
डिगस येथे पावणेदोन लाखाची दारू जप्त
ओरोस
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सिंधुदुर्ग भरारी पथकाने डिगस येथे अचानक टाकलेल्या छाप्यात एका घराच्या बाजूच्या राईत लपवून ठेवलेली गोवा बनावटीची बिगरपरवाना दारू जप्त केली. १ लाख ६८ हजार रुपये किमतीच्या या मुद्देमालासह संशयित ओंकार इंद्रजीत सावंत (२६, रा. डिगस, गोरीवलीवाडी) याला ताब्यात घेण्यात आले. इ. डिगस गावात गोवा बनावटीच्या बिगरपरवाना दारुचा साठा असल्याची माहिती सिंधुदुर्ग उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाला मिळाली होती. आयुक्त विजय सूर्यवंशी,संचालक सुनील चव्हाण, कोल्हापूर विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर, सिंधुदुर्ग जिल्हा अधीक्षक वैभव वैद्य यांना कल्पना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य
उत्पादन शुल्क, भरारी पथक सिंधुदुर्ग निरीक्षक शरद जाधव, दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत, दुय्यम निरीक्षक विशाल सरवटे, जवान नि वाहनचालक जगन चव्हाण यांनी ही कारवाई केली. एका काळ्या प्लास्टिकच्या कापडाखाली झाकून ठेवलेल्या ३५ पुट्ट्यांच्या खोक्यात गोवा बनावटीच्या दारुचा विविध ब्रॅन्डचा १ लाख ६८ हजार किमतीचा मुद्देमाल सापडला. याबाबतची फिर्याद दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत यांनी दिली आहे. त्यानुसार संशयित ओंकार इंद्रजीत सावंत याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दुय्यम निरीक्षक विशाल सरवटे करत आहेत.

