पदवीधर मतदार नोंदणीमध्ये निरुत्साह आतापर्यंत ३,९८२ मतदारांची नोंदणी
पदवीधर मतदार नोंदणीमध्ये निरुत्साह आतापर्यंत ३,९८२ मतदारांची नोंदणी
सिंधुदुर्गनगरी
महाराष्ट्र विधान परिषद कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाची मतदार नोंदणी सुरू होऊन महिना झाला, तरी पदवीधर मतदार नोंदणीला निरुत्साह दिसून येत आहे. आतापर्यंत ३ हजार ९८२ मतदारांनीच नोंदणी केलेली आहे. दरम्यान, मतदार नोंदणीसाठी ६ नोव्हेंबरपर्यंत मुदत असून सर्व पात्र मतदारांनी नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किशोर तावडे व उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी केले आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांची मुदत ७ जुलैला संपत आहे. तत्पूर्वी कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदारयादी तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. गेल्या महिनाभरात ३ हजार ९८२ मतदारांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये २५२७ पुरुष व १४६५ महिलांचा समावेश आहे. यात देवगड ४७१, वैभववाडी २२८, कणकवली
९०६ मालवण ३७९, कुडाळ ८३१, वेंगुर्ले ३५१, सावंतवाडी ६१३, दोडामार्ग २०३ असा समावेश आहे. यापूर्वी जिल्ह्यात ५ हजार ३०८ मतदार होते. यावेळी आतापर्यंत ३ हजार ९८२ मतदार नोंदणी झाली असून पूर्वीच्या मतदार नोंदणीएवढीसुद्धा नोंदणी झालेली नाही. मतदार नोंदणीसाठी आता अवघे पाच दिवस राहिले आहेत.
१ नोव्हेंबर २०२० पर्यंत पदवी अथवा पदविका पूर्ण केलेल्या पदवीधर नागरिकांना नावनोंदणी करता येणार आहे. तहसील कार्यालयात पात्र नागरिकांनी मतदार नोंदणी फॉर्म भरून द्यावा. यासाठी नागरिकांनी पदविका किंवा पदवीचे प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक, मतदान ओळखपत्रावरील नोंदणी क्रमांक व आधारकार्डाची माहिती द्यावी. पदविका प्रमाणपत्रधारकांना मतदार नोंदणी करता येणार आहे. यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५ हजार ३०८ पदवीधर मतदार म्हणून नोंदणी झाली होती. ही यादी आता रद्दबातल झाली आहे.

