कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या युवतीला रोखले

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या युवतीला रोखले

सावंतवाडी पोलिसांनी घेतले ताब्यात

सावंतवाडी

प्रियकर दुसऱ्या मुलीशी बोलत असल्याच्या रागातून एका २३ वर्षीय युवतीने सावंतवाडी राजवाड्यासमोरील मोती तलावात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार जागरुक नागरिकांच्या निदर्शनास येताच महिलांच्या मदतीने तिला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले. तात्काळ या घटनेची माहिती पोलीस यंत्रणेला दिल्यानंतर पोलीस दाखल होत त्या युवतीला ताब्यात घेतले. हा प्रकार बुधवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडला. सदरची युवती

कुडाळ तालुक्यातील असून ती सावंतवाडी बाजारपेठेतील एका दुकानात कामाला आहे. बुधवारी सकाळी ती कामावर येत असताना तिला एका मैत्रिणीकडून समजले की आपला प्रियकर दुसऱ्या मुलीशी बोलत आहे. त्यामुळे युवतीने प्रियकराला सावंतवाडीत बोलावून घेतले. या दोघांचे काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ‘तू दुसऱ्या मुलीशी का बोलतोस’, असे तिने विचारले. यावरून दोघांमध्ये भांडण झाले.

हा वाद सुरू असतानाच ते मोती तलावाच्या काठापर्यंत गेले. तेथे दोघांमध्ये झटापट झाली. युवतीने प्रियकराचा मोबाईल हिसकावून घेतल्यानंतर बाचाबाची सुरू झाली. हा प्रकार तलावाच्या बाजूने असलेल्या नागरिकांना निदर्शनास आला. सदरची युवती रागाच्या भरात मोती तलावात आत्महत्या करण्याच्या बेतात असताना नागरिकांनी महिलांच्या मदतीने तिला पकडून ठेवले. मात्र, गर्दीचा फायदा घेत प्रियकर तेथून निसटला. पोलिसांनी तिला ताब्यात घेत सावंतवाडी पोलीस ठाण्यात नेले. पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी तिच्याकडून वस्तुस्थिती जाणून घेतली. त्यावेळी तिच्या आत्महत्येच्या प्रयत्नामागचे कारण उघड झाले.. संबंधित युवतीच्या पालकांना या घटनेची माहिती दिल्यानंतर ते पोलीस ठाण्यात हजर झाले. तिचा जबाब घेऊन त्यानंतर तिला पालकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. तसेच प्रियकराचाही शोध घेऊन पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अधिकारी यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!