प्रत्येक जिल्ह्यात होणार बहुउद्देशीय संगणक केंद्र
प्रत्येक जिल्ह्यात होणार बहुउद्देशीय संगणक केंद्र
कणकवली
अलिकडेच तलाठी भरतीच्या अनुषंगाने झालेल्या परीक्षांसाठी सिंधुदुर्गमध्ये अशा परीक्षेकरीत केंद्रच उपलब्ध नसल्याने उमेवारांची मोठी गैरसोय झाली होती. त्यामुळे सिंधुदुर्गमध्ये असे केंद्र व्हावे, अशी सर्वच स्तराची अपेक्षा होती. मात्र, केंद्र शासनाच्या शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक जिल्ह्यात ५० ते १५० संगणक आसन क्षमता असलेले ‘बहुउद्देशीय संगणक केंद्र’ उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे असे केंद्र झाल्यास नीट व इतर संगणकामार्फत घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षांना येणारी अडचणही दूर होणार आहे.
केंद्र शासनाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० संपूर्ण देशात लागू केले आहे. या धोरणानुसार राज्यातील शिक्षण क्षेत्रात जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर होण्याकरीता तसेच ऑनलाईन -शिक्षण, ऑनलाईन प्रशिक्षण,
ऑनलाईन मूल्यमापन या बाबींकरिता डीजिटल पायाभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी ई वाचनालय व अभ्यासिका प्रत्येक जिल्ह्यात स्थापन करणे आवश्यक असल्याने शासनाने प्रत्येक जिल्ह्यात ५० ते १५० आसन क्षमता असणारे बहुउद्देशीय संगणक केंद्र स्थापन करण्यास मान्यता दिली आहे..
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून ही मान्यता देण्यात आली असली तरीही भविष्यात भरती वा विविध प्रकारच्या प्रवेशपूर्व परीक्षांसाठी संगणक सुविधा असलेले सेंटर उपलब्ध नसल्याने येणाऱ्या अडचणी यातून सुटणार आहेत. यात सिंधुदुर्गसाठी किमान १५० संगणक आसन क्षमतेचे केंद्र झाल्यास विद्यार्थ्यांची उमेदवारांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. शासनाने मान्यता दिलेले हे बहुउद्देशीय संगणक केंद्र लवकरात लवकर होण्याच्या दृष्टीने आता प्रयत्न होण्याची गरज आहे.

