आरक्षण न दिल्यास जिल्ह्यातील मराठा समाज रस्त्यावर उतरेल!
आरक्षण न दिल्यास जिल्ह्यातील मराठा समाज रस्त्यावर उतरेल!
कणकवली
मराठा आरक्षणासाठी प्रामाणिक लढा देणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांना अखिल भारतीय मराठा सेवा संघ, सिंधुदुर्गने पाठिंबा दिला आहे. मराठा समाजाला सरसकट आरक्षण न मिळाल्यास जिल्ह्यातील सर्व मराठा बांधव कोणत्याही क्षणी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा संघाचे जिल्हाध्यक्ष एस. टी. सावंत यांनी प्रसिद्धपत्रकाद्वारे दिला आहे.
मराठा समाज गेली अनेक वर्षे आरक्षणाविना आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी
प्रामाणिकपणे स्वत:ची जमीन विकत लढा उभारलेल्या जरांगे- पाटील यांना समाजबांधवांकडून पाठिंबा मिळत आहे. मराठा समाजाला आरक्षण कुणबी किंवा ९६ कुळी मराठा असा भेदभाव करून आपल्यात दुफळी निर्माण करण्यापेक्षा आरक्षण मिळणे फार महत्वाचे आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मराठा आरक्षण समिती
अध्यक्ष असताना अभ्यासपूर्वक पुरावे गोळा करत समाजाला १६ टक्के आरक्षण दिले होते. मात्र, ते आरक्षण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे समाजातील मुलांचे नुकसान झाले आहे. म्हणून ५० टक्के आरक्षणात बसवूनच समाजाला आरक्षण देण्यात यावे. गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा उभारलेल्या लढ्याला आमचा पाठिंबा आहे. ५० टक्क्यांच्या आत आरक्षण द्यावे, अशी मागणी आहे. ही मागणी मान्य झाल्यास लढण्याची वेळ यापुढे येणार नाही, असे सावंत,लवू वारंग, एल. एल. सपकाळ यांनी म्हटले आहे.

