वेंगुर्ल्यात आंबा बागायतदार, शास्त्रज्ञ कार्यशाळा
वेंगुर्ल्यात आंबा बागायतदार, शास्त्रज्ञ कार्यशाळा
वेंगुर्ले
महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले येथे शेतकरी शास्त्रज्ञ कार्यशाळा झाली.
कार्यक्रमाचे उद्घाटन स्मार्ट प्रकल्पाचे जिल्हा नोडल अधिकारी कुरकुटे यांच्या उपस्थितीत झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी निरंजन देसाई यांनी केले. आंबा उत्पादनातील तांत्रिक माहितीची आवश्यकता त्यांनी प्रतिपादित केली व हंगामापूर्वी शेतकऱ्यांनी आवश्यक माहिती घेऊन योग्य नियोजन केल्यास अधिक उत्पादन मिळेल, असे सांगितले. या कार्यक्रमास तालुक्यातील प्रगतशील आंबा बागायतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. अजय मुंज यांनी आंबा पिकावरील विविध मुख्य किडींची विस्तृत माहिती दिली. तुडतुडे व थ्रिप्स यावरील प्रभावी उपाययोजना करण्याकरिता कोकण कृषी विद्यापीठ यांच्या प्रमाणीत सहा फवारण्या योग्यवेळी कराव्यात, असे सुचविले. फळमाशीचा प्रभाव रोखण्याकरिता फळमाशी सापळे फेब्रुवारी, मार्च महिन्यापासून लावल्यास अधिक उपयुक्त राहतात, असे सांगितले. संशोधन केंद्राचे डॉ. यशवंत गोवेकर यांनी आंब्याच्या विविध रोगांविषयी विस्तृत माहिती दिली. या कार्यशाळेकरिता रत्नागिरी येथून हापूस आंबा उत्पादक व उत्पादक विक्रेते संघ यांचे मुकुंदराव जोशी उपस्थित होते. त्यांनी हापूस आंबा जिओग्राफिकल इंडिकेशनबाबत माहिती दिली. प्रगतशील बागायतदार सचिन गावडे, महादेव मातोंडकर, प्रसाद गावस्कर, सदाशिव आळवे, शिवराम आरोलकर आदी उपस्थित होते.

