सांगेली परिसरात गवारेड्यांचा उच्छाद
सांगेली परिसरात
गवारेड्यांचा उच्छाद
ओटवणे
सह्याद्री पट्ट्यात गवा रेड्यांच्या कळपाचा हातातोंडाशी आलेल्या भातशेतीत उच्छाद सुरूच आहे. रविवारी मध्यरात्री गवारेड्यांच्या कळपाने सांगेली- खळणेवाडीत कुटजी सावंत यांच्या काजू बागायतीला लक्ष्य करीत २५ काजुंच्या कलमांचे नुकसान केले. यात कुटजी सावंत यांचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. सध्या सह्याद्री पट्ट्यात गवारेड्यांचे कळप अनेक ठिकाणी हातातोंडाशी आलेल्या भातशेतीमध्ये उच्छाद मांडून भातशेतीचे अतोनात नुकसान केले. आता तर या गवारेड्यांच्या कळपाने काजू बागायतीलाही लक्ष केल्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी संकटाला सामोरे जावे लागत आहे. महाकाय गवे रेडे आपले अंग आणि शिंगे या काजूच्या कलमांना जोरदार घासत काजूच्या फांद्या जमीनदोस्त करतात तसेच काजू कलमांचे खोडही कमकुवत करतात. यापूर्वीही या भागात गवा रेड्यांच्या आक्रमक कळपांनी शेतातील शेतमळे उद्ध्वस्त केले आहे. या शेतमाळ्यावर राखण करणाऱ्या शेतकऱ्यालाही भर मध्यरात्री नजरकैदेत ठेवले होते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

