अनधिकृत वाळू वाहतूक करणारा डंपर उलटला
अनधिकृत वाळू वाहतूक करणारा डंपर उलटला
परुळे
परुळे बाधघाटीच्या तीव्र उतारावर अनधिकृत वाळूची वाहतूक करणारा डंपर उलटला. याबाबत लीलाधर सामंत यांनी भरधाव वाहतुकीबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आपल्या घराजवळ वारंवार बाजू देताना डंपर उलटून अपघात होतात. त्यामुळे आपल्या मालमत्तेचे नुकसान होते. मात्र, शासकीय अधिकारी अनधिकृत वाहतुकीला पाठबळ देत आहेत, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. रविवारी रात्री १०.३० च्या सुमारास डंपर कलंडला आणि अपघात झाला.
अनधिकृत वाळूची वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांकडून तक्रार मागे घेण्यासाठी आपल्यावर दबाव येत होता. मात्र, आपण कारवाईच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने पोलिसांना अखेर तक्रार दाखल करून घेणे भाग पडले, असे सामंत यांनी सांगितले.
मात्र, रातोरात डंपर अपघातस्थळावरून हटविण्यात आला .अशाप्रकारे अनेक अपघात सागरी महामार्गावर होतात. मात्र, वाळू माफियांच्या नेटवर्कवरून अधिकाऱ्यांना ‘मॅनेज’ करून प्रकरणे परस्पर मिटवून बेकायदा वाळूची रात्रीच्यावेळी परुळे-पाट – पिंगुळी दरम्यान सुसाट वेगाने वाहतूक केली जाते, याकडे प्रशासनाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत का, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. पोलीस प्रशासनातीलच अधिकारी म्हणताहेत, की वाळू व्यवसाय आणि डंपर वाहतूक बंद आहे मात्र चक्क माड्याचीवाडी येथील चेक पोस्टवर शेकडो डंपर थांबवून त्यांना पुढे सोडण्यात येते. या डंपरमधून कशाची वाहतूक होते, याची साधी चौकशी पोलीस करत नाहीत का, असा सवालही ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे.
