कणकवलीकोकणसामाजिकसिंधुदुर्ग

अत्यवस्थ स्थितीतील वृद्धेला पोलिसांमुळे जीवदान

अत्यवस्थ स्थितीतील वृद्धेला पोलिसांमुळे जीवदान

कणकवली

रक्तातील मधुमेहाचे प्रमाण कमी झाल्याने घरात अत्यवस्थ स्थितीत पडलेल्या वृषाली विठ्ठल नाईक (६०, कलमठ-बिडयेवाडी) या महिलेस कणकवली पोलिसांनी दरवाजा तोडून बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले. ही कामगिरी पोलीस उपनिरीक्षक विनायक चव्हाण, पोलीस नाईक चंद्रकांत माने व रुपेश गुरव यांनी केली. त्यामुळे महिलेचे प्राण वाचले असून पोलिसांच्या या कार्याचे नागरिकांनीही कौतुक केले. ही घटना सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास घडली. वृषाली मुंबईत कुटुंबियांसह राहतात. काही दिवसांपूर्वीच त्या एकट्याच गावी आल्या होत्या व सोमवारी त्या मुंबईला जाणार होत्या. सोमवारी सकाळच्या सुमारास शेजाऱ्यांना वृषाली यांना हाक मारूनही काहीच उत्तर न मिळाल्याने त्यांनी खिडकीतून पाहिले असता वृषाली हॉलमध्ये पडलेल्या स्थितीत आढळल्या. वृषाली यांच्या तोंडातून फेस येत होता व छातीची धडधड वाढली होती. याबाबत कुणीतरी कळविल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक चव्हाण हे पोलीस नाईक गुरव, माने यांच्यासह तेथे दाखल झाले. पुढे वृषाली यांना रुग्णवाहिकेद्वारे कणकवली उपजिल्हा रुग्णालय व तेथून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलिसांचे कणकवलीचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!