आता युवतींना मिळणार स्वसंरक्षणाचे धडे
आता युवतींना मिळणार स्वसंरक्षणाचे धडे
मालवण
राज्यातील तरुणींना स्वसंरक्षणाचे धडे मिळावेत, यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिर्मित्त राज्यात साडेतीन लाख शाळकरी व महाविद्यालयीन युवतींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महिला व बालविकास विभाग आणि राज्यातील सर्व विद्यापीठे, स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून ३ ते १५ जुलै या दरम्यान तीन दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले आहे.
सर्व तालुक्यात हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात आली असल्याचेही ते म्हणाले. मुलींसाठीस्वसंरक्षणाचा समावेश शालेय अभ्यासक्रमातच करावा, यासाठी शालेय शिक्षण विभागाला विनंती करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. महिला व मुलींवर होणारा क्रूर हिंसाचार व त्यातून केली जाणारी त्यांची हत्या शासन व समाजासमोर आव्हान ठरत आहे. राज्य सरकार त्यासाठी विविध उपाययोजना करत आहेच पण मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण कायम मिळावे, यासाठी त्याचा समावेश शालेय अभ्यासक्रमातच व्हावा म्हणून आपण निश्चित प्रयत्न करू. शालेय शिक्षण विभाग तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण विनंती करून पाठपुरावा करू, असेही लोढा म्हणाले. सर्व विद्यापीठे व स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने महाविद्यालयीन युवतींसाठी स्वसंरक्षण शिबिरांचे आयोजन करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

