हॉटेल व्यावसायिक, त्याच्या आईला मारहाण, कासार्डेच्या तिघांवर गुन्हा
हॉटेल व्यावसायिक, त्याच्या आईला मारहाण, कासार्डेच्या तिघांवर गुन्हा
कणकवली
कासार्डे येथील हॉटेल व्यावसायिक भरतेश रमेश शेट्टी (३४) व त्यांची आई गंगा रमेश शेट्टी (६७, दोन्ही रा. कासार्डे तिठा) यांना मारहाण. केल्याबाबत कासार्डे येथीलच सुरेश धोंडू पाताडे (५७), सुरेशचे मुलगे सर्वेश सुरेश पाताडे (२८) व सिद्धेश सुरेश पाताडे (२६) यांच्याविरोधात कणकवली पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कासार्डे-पेट्रोलपंपानजीकच्या भरतेश यांच्या हॉटेलनजीक रविवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
भरतेश यांच्या फिर्यादीनुसार, भरतेश यांचे कासार्डे येथे विजया नावाचे हॉटेल आहे. सदरचे हॉटेल आपल्या जमिनीमध्ये असल्याचे वरील संशयितांचे म्हणणे आहे. भरतेश यांनी हॉटेलच्या स्लॅबवर पत्र्याची शेड तयार केली. याच रागाने संशयितांनी भरतेश यांच्या हॉटेलच्या टेरेसवरील शेडच्या सामानाची मोडतोड केली. यावेळी त्यांनी भरतेश व त्यांची आई गंगा यांना हाताच्या थापटाने मारहाण केली. सिद्धेश याने भरतेश यांचा मोबाईल आपटून नुकसान केले. सर्वेश याने भरतेश यांच्या गळ्यातील चेन तोडली. तर सिद्धेश याने भरतेश यांच्या पायाच्या पोटरीवर फावडे फेकून मारले. संशयितांनी भरतेश व गंगा यांना शिविगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
