कुडाळ ग्रामपंचायतमधील शासकीय निधीचा अपहार केल्या गुन्ह्यातून तत्कालीन ग्रामविस्तार अधिकारी तांबे यांची निर्दोष मुक्तता
ओरोस : कुडाळ ग्रामपंचायतमधील विविध शासकीय निधिचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करुन अपहार केल्याचे गुन्ह्यातून तत्कालीन ग्रामविस्तार अधिकारी नामदेव तांबे यांची सिंधुदुर्गचे मे मुख्य न्यायदंडाधिकारी श्री. फडतरे साहेब यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपीतर्फे अॅड. बाळाजी बाबूराव रणशूर यांनी काम पाहीले. त्यांना अॅड. गोविंद बांदेकर यांनी सहकार्य केले.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की, कुडाळ ग्रामपंचायत मध्ये श्री. तांबे हे दि. ०१/०४/२००९ ते १५/०७/२००९ या कालावधीमध्ये ग्रामविस्तार अधिकारी म्हणून कार्यरत जोते. सदर कालावधीमध्ये विविध शासकीय निधी स्वतःसाठी वापरुन रु.६,८३,५९६/- कायम अपहार तसेच रु.९,८०,६७५/- रु. चा संशयीत अपहार केल्याचे विस्तार अधिकारी श्री. भास्कर केरवडेकर यांच्या प्राथमिक चौकशीमध्ये निष्पन्न झाले. त्याप्रमाणे त्यांनी आरोपीविरुद्ध कुडाळ पोलीस स्थानकात शासनाच्यावतीने भा.द.वि. कलम ४०९ प्रमाणे गुन्हा दाखल केलार सदर गुन्ह्याचा तपास करताना पोलीसांनी वरिष्ठ लेखा परिक्षक सिंधुदुर्ग यांचेकडून ग्रामपंचायतीचे ऑडीट करुन घेतले. त्यामध्ये एकूण १३,२९,७७७.९३ रुपयांचा कायम अपहार झालेले निष्पन्न झाले. करीता पोलीसांनी आरोपी विरुदध भा.द.वि. कलम ४०९ अन्वये दोषारोपपत्र दाखल केले होते.
सदरची केस सिंधुदुर्गचे मे मुख्य न्यायदंडाधिकारी श्री. फडतरे साहेब यांचे कोर्टात चालली. प्रकरण सिद्ध करण्याकरीता सरकार पक्षातर्फे श्री. केरवडेकर यांचेसहीत सहा साक्षिदार तपासण्यात आले. सदर साक्षीदारांचा उलट तपास घेताना ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डमध्ये मोठ्या प्रमाणात आरोपीच्या गैरहजेरीत खाडाखोड केलेली असल्याचे तसेच मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४० ची पुर्तता केली नसलेचे आरोपीचे वकील अॅड. रणशूर यांनी रेकॉर्डवर आणले. तसेच उपरोक्त मुद्यांसहीत आरोपीविरुद्ध खोटी तक्रार दाखल केलेला युक्तीवाद केला. सदरचा युक्तीवाद ग्राह्य मानून मे. कोर्टाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली.

