सुपारी घेऊन ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीघे निर्दोष
सन २००५ मधील घटना
कणकवली (प्रथमेश जाधव)
सावंतवाडी येथील आयुर्वेदीक कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या सचिन पांडुरंग नेवासे याने अनैसर्गिक लैंगिक कृत्य करण्यास नकार दिल्याच्या रागातून कट करून त्याला ठार मारण्याची सुपारी दिल्याप्रकरणी अक्षय मारुती नरळे, चंद्रेश कांजीभाई पटेल व भगवान सोपान मोरे सर्व रा. कल्याण यांची अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश सानिका जोशी यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपी नरळेच्यावतीन अॅड अजित भणगे, अॅङ सप्ना सामंत, अॅङ सुनिल मालवणकर, तर आरोपी चंद्रेश पटेलच्यावतीने अॅङ उमेश सावंत व भगवान मोरेच्यावतीने अॅङ बापू गवाणकर यांनी काम पाहिले.
दि. २६ जून २००५ रोजी सावंतवाडी आयुर्वेदीक कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या सचिन पांडुरंग नेवासे याच्यावर रात्री १०.१५ वा.च्या सुमारास २५ ते २८ वयोगटातील चार इसमांनी रुमच्या बाहेर बोलावून चाकू, ठोसे यांनी मारून गंभीर दुखापती केल्या. तसेच त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत त्याचा रुममेट ऋतुराज गोडबोले याने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञातांविरूद्ध भादंवि कलम ३२६ सह ३४ अन्वये सुरूवातीला गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याच्या तपासात पोलिसांना फरार आरोपी जयंतीभाई पटेल या इसमाशी सचिन नेवासे याची चांगली ओळख असल्याचे स्पष्ट झाले होते. जयंतीभाई त्याला भरीव मदत करून अनैसर्गिक कृत्य करत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर जेव्हा नेवासे याने सावंतवाडी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला त्यानंतर तशी कृत्ये करण्यास नकार दिल्याच्या रागातून जयंतीभाई याने त्याला ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यानुसार जयंतीभाई याने अक्षय नरळे याच्याशी संपर्क साधून त्याला डोळे फोडून हातपाय तोडण्यासाठी ५० हजार रुपयांची सुपारी देऊन गुन्हयाचा कट रचला होता. जयंतीभाई याच्या सूचनेनुसार फरार आरोपी राजेश गुप्ते, पुणे, संतोष दुबे, दिपक सपके रा. डोंबिवली व सचिन भोसले उर्फ सँडी यांच्यास भगवान मोरे, कल्याण यांना सचिनच्या फोटोच्या आधारे सावंतवाडी पाठविण्यात आले. सदर आरोपींनी त्याला चाकूच्या सहाय्याने मारहाण केली. याप्रकरणात चंद्रेश पटेल या आरोपीने जयंतीभाई पटेल याच्याकडून सुपारीची रक्कम अक्षय नरळे यास पोच केली. म्हणून एकूण आठ आरोपींवर भादंवि कलम ३०७, १२० व ३२३, ५०६ सह ३४ प्रमाणे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. अन्य आरोपी फरार असल्याने सदरचा खटला अक्षय नरळे, चंद्रेश पटेल व भगवान मोरे यांच्यावर स्वतंत्रपणे चालविण्यात आला. सुनावणीत आरोपींविरूद्ध सबळ कोणताही सबळ पुरावा न आल्याने त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

