फसवणूकप्रकरणी चौघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला
फसवणूकप्रकरणी चौघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला
ओरोस
अंबर प्रोजेक्टच्या माध्यमातून बंगलो बांधून देणार असल्याचे सांगून खरेदीदारांची १४ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तेजस घाडीगावकर, विनोद परमार, एन्टॉन नन्होना, नीलेश अवघडे (सर्व रा. मुंबई) या चारही संशयितांचा अटकपूर्व जामीन अर्ज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जे. भारुका यांनी फेटाळून लावला. सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी काम पाहिले. मुंबई-गोवा महामार्गाच्या बाजूने कणकवली- जानवली येथे अंबर प्रकल्पाचे बोर्ड व होर्डिंग्ज लावण्यात आले होते. त्यावरील मोबाईल नंबरवरून माहिती घेत कणकवली बाजारपेठेतील अंबरकार्यालयात जात सौ. शामल तळदेवकर (रा. जानवली – कणकवली) यांनी याबाबत सविस्तर माहिती घेतली होती. यावेळी त्यांना वरील चारही संशयित या कंपनीचे भागीदार असून या ठिकाणी अंबर प्रकल्पाचे २८ बंगलो बांधले जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच १८ महिन्यांत काम पूर्ण करून संबंधितांना ताबा दिला जाणार असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला होता. तर बूकिंगसाठी ४० टक्के रक्कम भरणे आवश्यक असल्याचे सांगितले गेल्याने १२ लाख रुपयांचा धनादेश सौ. शामल तळदेवकर यांनी संबंधितांकडे सुपूर्द केला होता. तसेच गोवा येथील सौ. गायत्री मुताडक व संजय मुताडक यांनी दोन लाख रुपये दिले होते. दरम्यान, मुदतीत बांधकाम होत नसल्याचेनिदर्शनास आल्याने करण्यात आलेल्या चौकशीत अशा प्रकल्पासाठी संबंधित ठिकाणच्या जमिनीची खरेदीच झाली नसल्याची बाब समोर आली. त्यामुळे आपले पैसे परत देण्याची मागणी गुंतवणूकदारांनी केली होती. मात्र ते देण्यात टाळाटाळ करण्यात आली होती. त्यामुळे आपली आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार शामल तळदेवकर यांनी कणकवली पोलिसांत दिली होती. गोवा येथील सौ. गायत्री मुताडक व संजय मुताडक यांचीही दोन लाख रुपयांची फसवणूक केल्याचे त्यांनी या तक्रारीत म्हटले होते. १९ जुलै २०२१ ते ५ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत घडलेल्या फसवणूकप्रकरणी ६ फेब्रुवारी २०२३ रोजी संशयितांवर भा. दं. वि. कलम ४२०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

