विनयभंगप्रकरणी आरोपीला तीन वर्षे कारावास, दंड
विनयभंगप्रकरणी आरोपीला तीन वर्षे कारावास, दंड
ओरोस
अल्पवयीन मुलीला अनैतिक संबंध ठेवण्याच्या उद्देशाने फूस लावून पळवून नेत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी विशाल नीलेश मोडक (२२, मूळ रा. बोर्डवे सध्या रा. शिवाजीनगर- कणकवली) याला दोषी धरून विशेष जिल्हा न्यायाधीश एस. जे. भारुका यांनी त्याला तीन वर्षे कारावास आणि १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील रुपेश देसाई यांनी काम पाहिले. १९ मार्च २०२० रोजी दहावी परीक्षेचा पेपर संपल्यानंतर संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याचा फायदा घेत आरोपीने तिला पळवून नेले होते. २२ मार्च २०२० रोजी या प्रकरणाची फिर्याद पीडित मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसात दिली होती. त्यानुसार याप्रकरणी विशाल नीलेश मोडक (२२, मूळ रा. बॉर्डवे बागवेवाडी, सध्या रा. शिवाजीनगर- कणकवली आणि विकास उर्फ विकी विजय धुरी (३०, रा. कासार्डे कणकवली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने विशाल मोडक याला दोषी धरून तीन वर्षे कारावास आणि १ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. तर दुसरा संशयित विकास धुरी याची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
