ग्राहक हितासाठीच ग्राहक संरक्षण कायदा- प्रा.श्री.एस.एन.पाटील

 

 

अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू असलेल्या ग्राहक राजाच्या हक्क संवर्धनासाठी ग्राहक संरक्षण कायदा-१९८६ अस्तित्वात आला. प्रत्येक नागरिकांनी हा कायदा समजून घेऊन आपल्या ग्राहक हक्काबरोबरच कर्तव्ये समजून व्यवहार केला पाहिजे. २४ डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्याचा हाच उद्देश असल्याचे ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे राज्य सदस्य व सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा.श्री. एस.एन.पाटील यांनी सांगितले.

वैभववाडी तहसील कार्यालयात काल मंगळवार दिनांक २७ डिसेंबर रोजी “राष्ट्रीय ग्राहक दिन” कार्यक्रम प्रभारी तहसीलदार श्री.अनंत कवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर निवडणूक नायब तहसीलदार श्रीमती सविता कासकर, पुरवठा अधिकारी श्री.रामेश्वर दांडगे, प्रमुख मार्गदर्शक प्रा.श्री. एस. एन. पाटील, संस्थेचे जिल्हा सचिव श्री.संदेश तुळसणकर, वैभववाडी व्यापारी संघाचे अध्यक्ष श्री.रत्नाकर कदम, वैभववाडी तालुका शाखेचे उपाध्यक्ष श्री. इंद्रजित परबते व सचिव श्री.तेजस साळुंखे उपस्थित होते.

२४ डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन आणि २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर हा ग्राहक सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या ग्राहक दिनाचे औचित्य साधून वैभववाडी तहसिलमध्ये राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी राष्ट्रीय ग्राहक दिन, ग्राहक संरक्षण कायद्याने ग्राहकांना दिलेले सहा अधिकार, ग्राहकांची कर्तव्ये तसेच २० जुलै,२०२० पासून नवीन ग्राहक संरक्षण कायदा-२०१९ लागू झाला असून ग्राहक हिताच्या दृष्टीने समाविष्ट केलेल्या महत्त्वाच्या कलमांची माहिती प्रा.श्री. एस एन पाटील यांनी दिली.

ग्राहकांनी दिलेल्या पैशाच्या मोबदल्यात चांगली वस्तू आणि सेवा दिली पाहिजे हा ग्राहकाचा हक्क असला तरी विक्रेत्यांनी सुद्धा आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे असे श्री.शरद नारकर यांनी सांगितले. ग्राहकांनी सुद्धा गडबड घाई न करता योग्य मोबदल्यात घेतलेला माल तपासून आणि सोबत त्याचे बिल घेतले पाहिजे असे व्यापारी मंडळाचे अध्यक्ष श्री.रत्नाकर कदम यांनी सांगितले.

ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्था, संस्थेचे तत्त्वज्ञान, संस्थेची भूमिका आणि संस्था तालुक्यात करीत असलेल्या कार्याचा आढावा घेऊन या राष्ट्रीय ग्राहक दिनाला बऱ्याच शासकीय अधिकाऱ्यांची अनुपस्थिती याबाबत सचिव श्री.तेजस साळुंखे यांनी नाराजी व्यक्त केली. संवाद, समन्वयात ग्राहक कल्याण आणि प्रशासनाचा सहकारी म्हणून संस्था काम करीत आहे असे जिल्हा सचिव श्री. संदेश तुळसणकर यांनी सांगितले.श्री.तेजस आंबेकर यांनी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्राहकांना आपले हक्क, अधिकार यांची जाणीव करून देण्यासाठी शासकीय पातळीवर या ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात येते. कार्यक्रमाला व्यापारी, दुकानदार व नागरिक यांनी उपस्थित राहून याचा फायदा घेतला पाहिजे. तहसील कार्यालयाच्या माध्यमातून आयोजित केला जाणाऱ्या ग्राहक प्रबोधन कार्यक्रमाला ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे आम्हाला नेहमी सहकार्य असते, आणि यापुढे राहील असे अध्यक्षीय भाषणात श्रीमती कासकर यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, बँक अधिकारी, व्यापारी प्रतिनिधी, ग्राहक व पत्रकार उपस्थित होते.

ग्राहक चळवळीचे अधिष्ठान स्वामी विवेकानंद यांची प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरवठा अधिकारी श्री.रामेश्वर दांडगे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभववाडी शाखेचे सल्लागार श्री.एस.पी.परब तर उपाध्यक्ष श्री.इंद्रजीत परबते यांनी सर्वांचे आभार मांडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!