मी सावंतवाडी मोती तलावाचा कठडा बोलतोय
*मी सावंतवाडी मोती तलावाचा कठडा बोलतोय*
मी एके काळच्या सुंदर वाडीच्या मोती तलावाचा संरक्षक कठडा व आताच्या सावंतवाडी मोती तलावाची संरक्षक भिंत बोलते… अनेक उंच उंच शिखरे गाठलेली माणसे माझ्या या काठावर बसून गेलीत, तीच माणसे आज मला वाईट नजरेने पाहत आहेत हे पाहून मला अतिव दुःख होत आहे, मला समजतंय काही अधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे माझा पायाच खोदला गेला व मी कोसळलो मला आधार द्यायला तेव्हा कोणाचाही हात नव्हता,माझ्यावर बसून अनेक जणांनी घरातल्या सुखदुःखांची देवाणघेवाण केली,अनेक जणांनी देश-विदेशातील राजकीय घडामोडीवर चर्चा केली तर काही जणांना काव्यपंक्ती सुचल्या मात्र त्याच कठड्या कडे आज येणारे- जाणारे पादचारी अरेरे काही अवस्था म्हणून बोलतात तेव्हा माझ्या मनाला असंह्य अशा वेदना होतात, त्या वेदना मी कोणाकडे व्यक्त करू असा प्रश्न मला पडतो, तेव्हा दगड रुपी पाषाणात जसा पाझर फुटतो तसा मलाही पाझर फुटतो..
मोती तलाव हे सावंतवाडी शहराचे नाक म्हणून समजले जाते या तलावामुळेच या सावंतवाडी शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे, आणि या तलावाला संरक्षण देणारा मी म्हणजे कठडा, संस्थानकाळी माझी बांधणी झाली ती कोणताही भ्रष्टाचार न होता,त्यामुळे ती भक्कम स्वरूपाची होती, कधीही न ढासळणारी, मात्र भ्रष्टाचार ने पोखरलेली सरकारी यंत्रणा, कोणाचा कोणालाही ताळमेळ नसणारे लोकप्रतिनिधी, यामुळे गाळ काढण्याच्या नावाखाली माझा पायाच खालून पोखरला गेला त्यामुळे मला कोणाचा आधार राहिला नाही व ऐन पावसाळ्यात मी कोसळलो, अनेक जणांचा हात धरण्याचा प्रयत्न केला परंतु ते हात तोकडे पडले व मी काही क्षणात जमीन दोस्त झालो,यात माझी काय चुकी मी विना भ्रष्टाचाराचा उभा होतो कित्येक पावसाळे झेलले,मात्र माझ्यावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही, ऊन, पाऊस, वादळ, वारे सर्व सोसले याचा फरक मला कधी पडला नाही,मात्र स्वतःला उच्च विद्याविभूषित समजणारी नगरपालिकेतील अभियंता मंडळी अधिकारी, सार्वजनिक हीत जोपासणारी सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकारी मंडळी यांनी संगनमताने जेव्हा माझा पायाच पोखरण्याचा प्रयत्न केला तेव्हाच मला कळून चुकले होते मी कोसळणारच, ढासळणारच आणि मी कोसळलोच.. माझा पाया इतका मजबूत होता की कित्येक वर्ष तो जशाचा तसा उभा होता अनेक वजने मी झेललीत मात्र मी हललो नाही.
माझ्यावर अवजड वाहने चढवून माझ्या तलावातील गाळ काढण्याच्या नावाखाली माझा पायाच खोदला गेला त्यावेळी असंह्य वेदना मला होत होत्या, सावंतवाडी करांनाही त्याचे वाईट वाटत होते, कारण याच माझ्या काठावर बसणाऱ्याने अनेकदा तसे बोलूनही दाखवले होते.
पण उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या या अधिकाऱ्यांना सांगणार कोण हा प्रश्न पडला होता, या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे आज शासनाचे करोडो रुपये माझ्यावर पुन्हा खर्च पडणार आहेत, ते भविष्यकाळात टिकाऊ असतील की विकाऊ असतील हा प्रश्न आहे, मी पुढे किती काळ तग धरेन हा ही प्रश्न आहे, मात्र माझ्यामुळे राजकारण रंगले काहींनी माझ्यावर लेख लिहिले, काहींनी सह्यांची मोहीम राबविणार म्हणून सांगितले, तेव्हा कुठे या झोपी गेलेल्या बांधकाम विभागाला व नगरपालिकेला जाग आली व पुन्हा एकदा माझे बांधकाम करण्याचा निर्धार केला गेला, त्याची सुरुवात कधी होईल ते काम कधी संपेल ते किती टिकाऊ असेल याबद्दल माझे मन साशंक आहे,
कारण संस्थानकाळात विना भ्रष्टाचार केलेले काम आजही जशाच्या तसे होते ते कोसळले फक्त यांच्या चुकीच्या कर्मामुळेच व त्याचा दोष ठेवला गेला माझ्यावर, पुन्हा एकदा हे बांधकाम उभे राहणार आहे मात्र ते किती काळ टिकेल याची शाश्वती मी देऊ शकत नाही.पुढचे ऊन पाऊस वारा मी झेलू शकेन का हेही सांगू शकत नाही.
कारण एकच आहे मला पुन्हा उभे करताना संस्थान काळचे निरपेक्ष हेतूने काम करणारे हात नसतील तर भ्रष्टाचाराने माखलेले हात असतील.
(टीप..निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मी विहीर बोलतेय,मी कचरा डेपो बोलतोय अशा राजकीय पोस्ट व्हायरल व्हायला लागल्या आमच्या सावंतवाडीच्या मोती तलावाच्या कठड्यालाही वाटले आपणही बोलावे)…

