स्वर्गीय विनायक मेटे यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर,शिवसंग्राम संघटनेची आज प्रथमच राज्यस्तरीय बैठक पुणे येथे संपन्न
पुणे, दि,०७: शिव संग्राम चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तानाजी शिंदे यांच्या उपस्थिती मध्ये पुणे येथे बैठक घेण्यात आली. स्वर्गीय विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर संघटनेच्या कार्यकर्त्यांत जी दुःखाची व काहीशी नैराश्याची भावना निर्माण झाली. त्यासाठी त्यांच्या पत्नी डॉ.ज्योती मेटे यांनी रिक्त झालेले राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारावे हा पहिला ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला. आणि महायुतीतील मित्रपक्ष म्हणून भाजपने स्वर्गीय विनायक मेटे यांना विधानपरिषदे सह मंत्रीपद देण्याचा शब्द दिला होता. आता त्याचे पालन करत डॉ.ज्योती मेटे यांना विधानपरिषद व मंत्रीपद मिळणे. हा आमचा हक्क देऊन भाजपने वचनपूर्ती करावी ! हा ठरावही एकमुखाने पारित करण्यात आला.
तसेच स्वर्गीय विनायक मेटे यांनी मराठा आरक्षण, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिवस्मारक आदी. बाबींसाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले ! त्यांच्या माघारी हतबल न होता डॉ.ज्योती मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली दुप्पट जोमाने वरील विषय सोडविण्यासाठी शिवसंग्रामचा प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ता कटिबद्ध असेल. हा ठरावही गांभीर्याने व एकमताने मंजूर करण्यात आला. व
राज्यभर दौरा करून पुन्हा चैतन्य निर्माण करण्यासाठी मेळावे घेणार असल्याचा महत्वाचा निर्णय आज घेण्यात आला.
स्वर्गीय विनायक मेटे आयुष्यभर मराठा आरक्षण व या समाजाच्या इतर समस्या, मुंबईतील आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिवस्मारक तसेच शेतकरी पेन्शन योजना आदींसाठी संघर्ष केला. तो लढा संपूर्ण ताकदीने लढायचा निर्धार सगळ्यांनी व्यक्त केला.
वरील संघर्षाला बळ मिळावे यासाठी, स्वर्गीय विनायक मेटे यांना भारतीय जनता पक्षाने शब्द दिला होता.आता डॉ.ज्योती मेटे यांना विधानपरिषद व मंत्रीपद दिलेच पाहिजे असा ठराव पारित करण्यात आला. विधानपरिषद व मंत्रीपद हा मित्रपक्ष या नात्याने आमचा हक्क असल्याची ठाम भूमिका अनेकांनी मांडली.
शेवटी स्वतःचे मनोगत व्यक्त करताना डॉ.ज्योती मेटे म्हणाल्या की स्वर्गीय विनायक मेटे हे स्वतःच्या कुटुंबाप्रमाणेच शिवसंग्रामला आपले कुटुंबच मानत होते. त्यांच्या दुर्दैवी मृत्यू नंतर, त्यांची उत्तराधिकारी म्हणून कुटुंबप्रमुख ही जबाबदारी माझ्यावर आलेली आहे. व मी या शिवसंग्राम माझ्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाही. राज्यातील सर्वच कार्यकर्त्यांच्या बळावर मी स्व.मेटे यांची अधुरी राहिलेली कामे पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू !
डॉ.ज्योती मेटे यांनी राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारावे तसेच विधान परिषदेचे सदस्यपद व मंत्रीपद काम करावे या सर्व कार्यकर्त्यांच्या विनंतीला त्यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला. काही कायदेशीर बाबींमुळे लवकरात लवकर त्या त्यांचा होकार कळवणार आहेत. असे त्यांनी सांगितले.
सदरच्या बैठकीसाठी शिवसंग्राम गुजरातचे प्रदेशाध्यक्ष मनीष पगार, राज्याचे सरचिटणीस विक्रांत आंब्रे, उपाध्यक्ष संदीप पाटील, राजन घाग, युवकाध्यक्ष उदय आहेर,धुळे जि.प.सदस्य ज्ञानेश्वर भामरे,बीड चे अप्पा कोलंगडे, प्रदेश सचिव शेखर पवार, हिंदुराव जाधव मुख्य प्रवक्ते, प्रफुल्ल पवार चित्रपट आणि सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दिपक कदम, मुंबई कार्याध्यक्ष विवेक सावंत,आदींसह राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख हजर होते.
बैठकीचे आयोजन स्थानिक पदाधिकारी भरत लगड, केतन महामुनी, कालिंदि गोडांबे, सचिन दरेकर, लहू ओहोळ, समीर निकम, विनोद शिंदे, संगीता घुले, चेतन भालेकर, कल्याणराव अडागळे आदींनी केले.