ना.रवींद्र चव्हाण यांनी घेतली अधिकाऱ्यांची तातडीने आढावा बैठक
*ना.रवींद्र चव्हाण यांनी घेतली अधिकाऱ्यांची तातडीने आढावा बैठक*
कोकणातील महामार्ग आणि प्रलंबित कामाबाबाबत अधिकाऱ्यांना केल्या सूचना
चिपळूण (ओंकार रेळेकर) राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रविंद्र चव्हाण यांनी मंगळवारी सार्वजनिक बांधकाम खात्यातील सर्व अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक घेऊन गणेशोत्सव काळात नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्याच्या सूचना केल्या .
ना.श्री.रविंद्र चव्हाण मंत्री, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक
उपक्रम वगळून) अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, महाराष्ट्र राज्य
यांनी दिनांक ३०/०८/२०२२ रोजी राज्यातील सार्वजनिक बांधकाम
विभागाकडील कामांच्या प्रगतीबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा
घेतला. बैठकीस मा. श्री. मनोज सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव,
श्री. एस. एस. साळुंखे, सचिव (रस्ते), श्री. पी. डी. नवघरे, सचिव ( बांधकामे) व
राज्यातील सर्व मुख्य अभियंता उपस्थित होते.
सदर बैठकीमध्ये मुंबई गोवा हायवेवरील चिपळूण शहरातून जाणा-या
उड्डाणपुलाच्या लांबीमधील सेवा रस्त्यांवर प्रत्येक पावसाळयात खड्डयांच्या
उद्भवणा-या समस्येबद्दल सविस्तर चर्चा झाली. चिपळूण शहरात कुंभार्ली
घाटाकडून येणारी वाहतुक, गुहागरकडून येणारी वाहतुक तसेच रत्नागिरी व
मुंबईकडून येणारी वाहतुक मोठ्या प्रमाणावर असते. शाळा, कॉलेजचे
विद्यार्थी, शेतकरी व नोकरदार वर्ग यांना चिपळूण शहरात दैनंदिन
कामासाठी यावे लागते त्यांची भविष्यात रस्त्यावरील खड्डयांच्या त्रासातून
सुटका होणे आवश्यक असलेचे मत मा. मंत्री महोदय यांनी व्यक्त केले.
चर्चेअंती या समस्येवरती कायमस्वरुपी उपाययोजना करणेच्या दृष्टीने
मा. मंत्री महोदयांनी चिपळूण शहरातून जाणा-या उड्डाणपुलाच्या लांबीमधील
सेवा रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणेचे आदेश दिले जेणेकरुन चिपळूण
शहराच्या आजुबाजुने जोडणा-या मार्गांवरुन होणा-या अवजड वाहतुकीमुळे
नमुद लांबीतील सेवा रस्ते खराब होणार नाहीत तसेच चिपळूण
शहरवासीयांची प्रत्येक पावसाळ्यात उद्भवणा-या या समस्येतून
कायमस्वरुपी सुटका होईल.

