सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळालेली मंत्री पदे औटघटकेची तर ठरणार नाहीत ना? डॉ जयेंद्र परुळेकर.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळालेली मंत्री पदे औटघटकेची तर ठरणार नाहीत ना? डॉ जयेंद्र परुळेकर.
सावंतवाडी, ता. १० : सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याला तीन मंत्रिपदे मिळाली आहे. मात्र ही मंत्रीपदे औटघटकेची ठरणार नाहीत ना? शिंदे सरकार कोसळणार नाही ना? असा सवाल शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केला आहे. आता उद्योग मंत्री पद मिळाल्यामुळे कुडाळपासून आडाळी औद्योगिक क्षेत्राचे प्रश्न सुटतील, जिल्ह्यातील लोकांना रोजगार मिळेल, अनेक बंद पडलेले पर्यटन प्रकल्प नव्या जोमाने सुरू होतील का? हा मात्र प्रश्न आहे, असाही चिमटा त्यांनी काढला आहे. श्री. परूळेकर यांनी मंत्री पदाचा विस्तार झाल्यानंतर प्रसिद्ध पत्रकाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली आहे.
त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, सिंधुदुर्ग-रत्नागिरीतून श्री. केसरकर, सामंत व चव्हाण यांना मंत्रिपद मिळाल्यामुळे जिल्ह्यातील जनतेमध्ये आता अनेक आशा आकांक्षा पल्लवित झाल्या आहेत. आंबोलीपासून ते विजयदुर्ग पर्यंतचे अनेक बंद पडलेले पर्यटन प्रकल्प आता नव्या जोमाने सुरू होतील. आणखी नवनवे पर्यटन प्रकल्प जिल्ह्यात सुरू होतील. सी – वर्ल्ड पासून पर्यटन सबमरीन सारखे अनेक प्रकल्प कार्यान्वित होतील. लाखो पर्यटक प्रतिवर्षी जिल्ह्यात येतील, अशा अपेक्षा आहेत. मात्र जनतेच्या मनात शंकेची पाल सतत चुकचुकत आहे. कि ही मंत्रीपदे औटघटकेची तर ठरणार नाहीत ना? शिंदे सरकार हे टिकेल की कोसळेल?
एक पहाटे स्थापन झालेलं ८० तासांचे सरकार महाराष्ट्राने आधीच पाहिले आहे. त्यामुळे हे सरकार ८० दिवस तरी तग धरेल काय ? असे अनेक सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.

