रोणापालमध्ये तीन दिवस घरावर झेंडा फडकणार – ग्रामसभेत सरपंच सुरेश गावडे यांचा निर्धार : भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
रोणापालमध्ये तीन दिवस घरावर झेंडा फडकणार
– ग्रामसभेत सरपंच सुरेश गावडे यांचा निर्धार : भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
बांदा:प्रतिनिधी:शैलेश गवस
आरोग्य, सामाजिक कार्य, सेंद्रिय शेती असे अनेक उपक्रम राबवून देशाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करूया. दि. 13 ते 15 रोजी तीन दिवस प्रत्येकाच्या घरी झेंडा फडकावला पाहिजे असा निर्धार रोणापाल सरपंच सुरेश गावडे व सहकाऱ्यांनी केला.
रोणापाल स्वामी दयासागर छात्रालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ग्रामसभा सरपंच सुरेश गावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी ग्रामसेवक प्रतिभा आळवे, उपसरपंच पप्या केणी, माजी सरपंच उदय देऊलकर व पदाधिकारी तसेच कर्मचारी वर्ग, अंगणवाडी सेविका, बचत गट आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
स्वतंत्र भारताचा अमृत महोत्सवानिमित्त सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविण्याचे ठरविण्यात आले. यामध्ये रोणापाल माऊली मंदिर येथे माऊली भजन मंडळ रोणापाल देऊळवाडी, ग्रामपंचायत कार्यालय येथे यशश्री बचत गट, जिल्हा परिषद दवाखाना येथे खेरकटवाडीतील सर्व बचत गट, भरडवाडी अंगणवाडी येथे तेथील पालक व ग्रामस्थ, जिल्हा परिषद शाळा येथे पालक व खेरकटवाडी बचत गट, ख्रिश्चनवाडी चर्च येथे तेथील बचत गट यांनी साफ सफाई करण्याची स्वतः म्हणून जबाबदारी स्वीकारली.
तसेच दि. 9 ते 17 रोजी पर्यंत कार्यक्रम यशस्वी होण्यासाठीचे नियोजन करण्यात आले. यात सेंद्रिय शेती बाबतची माहिती देण्यासाठी सावंतवाडी तालुका निवृत्त कृषी अधिकारी काका परब, आरोग्य विषयक माहितीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र बांदा वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील तसेच अशा विविध कार्यक्रमांसाठी त्या त्या क्षेत्रातील मान्यवरांना मार्गदर्शनासाठी निमंत्रित करण्यात आल्याची माहिती रोणापाल सरपंच सुरेश गावडे यांनी दिली.
विशेष म्हणजे या महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रमात 16 तारीखला जिल्हा परिषद दवाखाना रोणापाल येथे ग्रामपंचायत रोणापाल आणि एस.एस.पी.एम.हॉस्पिटल पडवे, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर घेण्याचे ठरले. आरोग्य शिबिरात हृदय रोग, नेत्र, किडनी, कॅन्सर, जनरल सर्जरी, युरोलोजी, दात आणि अस्थिरोग यासह इतरही तपासणी होऊन उपचारांचे मार्गदर्शनसह व सुविधा उपलब्धतेनुसार काय करता येईल याबाबत मार्गदर्शन केले जाईल. शासकीय योजनेत शस्त्रक्रिया करण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आणि जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

