कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची आमदार दीपक केसरकर यांच्या घरा समोरून मिरवणूक काढण्यास पोलिसांचा विरोध

युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची आमदार दीपक केसरकर यांच्या घरा समोरून मिरवणूक काढण्यास पोलिसांचा विरोध

सावंतवाडी/दि ३१ : शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या उद्या होणाऱ्या सावंतवाडीतील नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा अलर्ट झाली आहे. कोणताही वाद नको म्हणून आमदार केसरकर यांच्या घरासमोरुन मिरणवणूक नेण्यास शिवसैनिकांना अटकाव करण्यात आला आहे. तर पर्याय म्हणून उद्यान परिसर किंवा चिटणीस नाक्यावरुन मिरवूणक काढा, अशा सुचना वजा आदेश पोलिस खात्याकडुन देण्यात आल्या आहेत. दरम्यान आम्ही ठरविले तर कुठूनही मिरवणूक काढू शकतो. परंतु उद्या आमचे नेते निष्ठा यात्रेच्या निमित्ताने लोकांशी संवाद साधण्यासाठी येत आहे. त्यामुळे चांगल्या कार्यात अपशकून नको म्हणून आम्ही शांत आहोत. उद्या दोन ते अडीच हजार लोक उपस्थित राहणार आहे, असे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी सांगितले.
राज्यात घडलेल्या सत्ता संघर्षानंतर शिंदे व फडणवीस सरकार स्थापन झाले. शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलेले आमदार शिंदे गटात गेल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जे आमदार गेले त्यांच्या मतदार संघात निष्ठा यात्रा काढुन मतदारांशी संपर्क साधण्याचा निर्णय युवा नेते आदित्य ठाकरे यांनी घेतला आहे या पार्श्वभूमीवर उद्या ते सावंतवाडीत सभा घेणार आहे. तत्पुर्वी शिवसैनिकांनी केलेल्या नियोजनात येथील गवळीतिठा परिसरातून थेट गांधी चौकापर्यंत मिरवणूक काढुन त्यानंतर श्री. ठाकरे यांची सभा घेण्याचे ठरले होते. मात्र राजकीय परिस्थिती लक्षात घेवून पोलिसांनी त्यांना गवळीतिठा ऐवजी चिटणीसनाका परिसरातून मिरवणूक काढा, अशा सुचना दिल्या आहेत. वाटेत आमदार केसरकर यांचे निवासस्थान असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार नको त्यामुळे हा निर्णय घेतला आहे, असा पोलिस प्रशासनाचे म्हणणे आहे. याबाबत पोलिस निरिक्षक शंकर कोरे यांनी दुजोरा दिला असून आम्ही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना तशी विनंती केली, असे त्यांनी सांगितले. दरम्यान याबाबत तालुकाप्रमुख राऊळ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आम्ही ठरविल्यास कोठूनही मिरवणूक काढू शकतो. परंतु आमचे नेते हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी येत आहेत. त्यामुळे चांगल्या कार्यात अपशकून नको म्हणून आम्ही चिटणीस नाक्यावरुन मिरवणूक पुढे घेण्याचे मान्य केले आहे. उद्या होणाऱ्या मिरवणूक आणि सभेसाठी सुमारे अडीच हजार शिवसैनिक उपस्थित राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आज या पार्श्वभूमीवर नियोजन करण्यात आले.
यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, विधानसभा सहसंपर्क प्रमुख शैलेश परब, तालुकाध्यक्ष रुपेश राऊळ, गुणाजी गावडे, सागर नाणोसकर, चंद्रकांत कासार, बाळा गावडे, अर्पणा कोठावळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!