ते आदेश काढणाऱ्या जिल्हा प्रशासनाची भूमिका संशयास्पद व सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली
*ते आदेश काढणाऱ्या जिल्हा प्रशासनाची भूमिका संशयास्पद व सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली*
*जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित देसाई यांचा आरोप*
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोरोनाचा कहर सुरू होता तेव्हा शिवसेनेच्या नेत्यांचे वाढदिवस हजारो लोकांच्या उपस्थितीत पार पडले. या कार्यक्रमाला स्वतः जिल्ह्याचे पालकमंत्री देखील उपस्थित होते. त्यानंतर शिव संपर्क अभियानाच्या निमित्ताने शिवसेनेचे आमदार,खासदार व पदाधिकारी गावागावात फिरून कोरोना नियमांची पायमल्ली करत होते. संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर तेव्हा कोरोनाचा संसर्ग व मृत्यू दर हा सर्वात जास्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होता. मात्र त्या कालावधीत साथरोग नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यांवर कोणतेही गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत. त्यावेळी जिल्हा प्रशासन हे गांधारी प्रमाणे डोळ्याला पट्टी बांधून काम करत होते. मात्र आता राणे साहेबांची जन आशीर्वाद यात्रा जिल्ह्यात येतानाच नेमका जमावबंदी आदेश लादण्याची दुर्बुद्धी जिल्हा प्रशासनाला सुचली आहे. हे आदेश जिल्हा प्रशासनाने मुख्यमंत्री, पालकमंत्री व सत्ताधारी यांच्या दबावाखाली काढले आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनांकडे डोळेझाक करून केवळ भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना खोट्या केसेस मध्ये गोवले जात आहे. नारायणराव राणे यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून समज देण्यात येत आहे तर राणेसाहेबांच्या सुटकेनंतर फटाके वाजवून आनंद व्यक्त करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना विविध गुन्ह्यामध्ये अडकवण्यात येत आहे. राज्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी हे सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत असून त्याचीच प्रचिती संगमेश्वर येथे नारायणराव राणे साहेब यांना अटक करताना आली आहे. राज्याचे मंत्री अनिल परब यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ठाकरे सरकारमधील या वसुली बाज मंत्र्यांचे कारनामे जनतेसमोर येऊ लागले आहेत. त्यामुळेच कोणतेही सबळ कारण नसताना व कोणताही सारासार विचार न करता केवळ जन आशीर्वाद यात्रा कशा प्रकारे रोखता येईल याकरता सत्ताधारी व प्रशासनाचे सुरू असलेले हे प्रयत्न निष्फळ ठरणार असून वेळ पडल्यास जनता सविनय कायदेभंग करून या आशीर्वाद यात्रेमध्ये सहभागी होईल असा विश्वास रणजित देसाई यांनी व्यक्त केला आहे. एकीकडे जिल्हा प्रशासन ऑगस्ट पूर्वी गावागावात ग्रामसभा घेण्याचे आदेश देत आहे व दुसरीकडे जमावबंदी आदेश लादत आहे. जमावबंदी आदेश लागू असताना पाच लोकांपेक्षा जास्त लोक एकत्र येऊन ग्रामसभा कशा पार पाडणार असा सवाल करत उद्या ग्रामसभांमध्ये कोणत्याही प्रकारची कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची परिस्थिती निर्माण झाली तर त्याला जिल्हा प्रशासन कारणीभूत राहील असे देखील रणजित देसाई यांनी म्हटले आहे. गणेश चतुर्थी जवळ आली असताना जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करून एकंदरीत जिल्ह्याच्या बाजारपेठा व अन्य अर्थकारणावर परिणाम करणारे हे आदेश अत्यंत चुकीचे असून जिल्हा प्रशासनाने वेळीच आदेश मागे घ्यावेत असे देखील म्हटले आहे. नारायणराव राणे साहेब यांची जनआशीर्वाद यात्रा ही कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होणारच असून आहे त्याकरिता प्रसंगी कितीही गुन्हे दाखल झाले तरी ते घेण्यात अंगावर घेण्याकरता भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सक्षम आहेत असे देखील रणजित देसाई यांनी म्हटले आहे.

