🛑 माणगाव खोऱ्याचा विकास करणाऱ्या आंजिवडे- कोल्हापूर या घाट रस्त्यासाठी सर्व पक्षियांकडून प्रयत्न व्हावा..
🛑 पत्रकार परिषदेत कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली मागणी..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी, दि-२१ :- सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाचा वाटा ठरणाऱ्या तसेच विशेषतः माणगाव खोऱ्याचा विकास करणाऱ्या आंजिवडे- कोल्हापूर या घाट रस्त्यासाठी सर्व पक्षियांकडून प्रयत्न व्हावा, अशी मागणी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
दरम्यान हा घाट रस्ता झाल्यास त्याचा फायदा सावंतवाडी, वेंगुर्ला व कुडाळसह कोल्हापूर मधील पाटगाव, आदी भागाला होणार आहे. तर कोल्हापूरचे येता-जाता अंतर ६४ कीलोमिटर कमी होणार आहे. त्याचबरोबर सह्याद्री मार्ग, राष्ट्रीय महामार्ग आणि सागरी महामार्गाला जोडला जाणार आहे. त्यामुळे या महामार्गासाठी सर्वाकडून रेटा होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कृती समितीचे अध्यक्ष किशोर शिरोडकर व सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज याठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी ही मागणी केली.
यावेळी कृती समितीचे उपाध्यक्ष बाळ सावंत,सचिव एकनाथ केसरकर, साईनाथ नार्वेकर, आबा केसरकर, शाम पावसकर, राजू कविटकर, सावंतवाडी नगरसेवक सुरेद्र बांदेकर, माजी नगरसेवक अफरोझ राजगुरू, अरुण पणदुरकर, सुरेश भोगटे, अभय पंडीत, रवी जाधव, संदिप नाईक, सौरभ सलमाने, सत्यम सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी श्री शिरोडकर म्हणाले, हा घाट रस्ता झाल्यास त्याचा फायदा दोन्ही जिल्ह्यांना होणार आहे. तसेच गेली अनेक वर्षे दुर्लक्षित असलेल्या माणगाव खोऱ्याचा विकास होणार आहे. विशेष म्हणजे हा रस्ता पुर्ण होण्यासाठी कोणताही घाट मार्ग आड येत नाही. सरळ रस्ता आहे. फक्त तीन कीलो मिटर वगळता सर्व मार्ग चालू स्थितीत आहे. त्यामुळे हा मार्ग तात्काळ मार्गी लागू शकतो. यासाठी आवश्यक असलेला पाठपुरावा आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. त्याला पालकमंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांनी हीरवा कंदील दिला आहे. तत्कालीन बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या रस्त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन सुध्दा दिले होते. मात्र कोरोनाच्या काळात आम्हाला म्हणावा तसा पाठपुरावा करता आला नाही, त्यामुळे आता पुन्हा एकदा ही लढाई सुरू करण्यात आली आहे. यात परिसरातील अनेक ग्रामस्थ, सर्वपक्षीयांनी आपला सहभाग दर्शवावा, असे त्यांनी यावेळी म्हटले.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, ॲड सुभाष पणदूरकर, बाळ सावंत यांनी आपले विचार मांडले.

