पुणेकरांनो! सोमवारपासून निर्बंध शिथिल होऊ शकतात, आजच्या बैठकीकडे लक्ष…
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️प्रतिनिधी : सुर्यकांत जाधव
🎴पुणे : दि.०८ : पुण्यात आज निर्बंध शिथिल होणार यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये पुणेकरांना दिलासा मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. राज्य सरकारने २५ जिल्ह्यातील कोरोना निर्बंधामध्ये शिथिलता दिल्यानंतर पुण्याला मात्र लेव्हल ३ वर ठेवण्यात आलं होतं.
पण यामुळे व्यापारी आणि नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. या पार्श्वभूमीवर पुण्यातील व्यापाऱ्यांना दिलासा देण्याचा विचार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्याची माहिती समोर येते आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत काय निर्णय होणार ?याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.
खंरतर, पुणे शहरात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाबाधितांचा (पॉझिटिव्हिटी रेट) पाच टक्के असलेला दर सध्या तीन टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. गेल्या दोन दिवसांत हा दर तीन टक्क्यांच्याही खाली आहे. तरीही, शहरातील निर्बंध कमी करण्याबाबत राज्य सरकारचे ‘हाताची घडी, तोंडावर बोट’ ठेवले आहे. पण यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार आज बैठक घेणार आहेत. त्यामुळे यामध्ये तरी पुणेकरांना दिलासा देणारा निर्णय घेतला जाणार का, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
गेल्या पाच आठवड्यांपासून शहरातील कोरोनाबाधितांचा दर सातत्याने घटतो आहे. गेल्या दोन दिवसांत तर कोरोनाबाधितांचा दर दोन टक्क्यांपेक्षाही कमी झाला आहे. जुलै महिन्यांत दोन ते आठ तारखेदरम्यान कोरोनाबाधितांचा दर पाच टक्के होता. तो ३० जुलै ते पाच ऑगस्ट या आठवड्यात ३.२२ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. एकीकडे शहरात कोरोनबाधितांचा दर सातत्याने कमी होत असतानाही जिल्ह्यात कोरोनाचा दर जास्त असल्याने त्याचा फटका पुणेकरांना सहन करावा लागत आहे. हीच भूमिका इतर जिल्ह्यांतील महत्त्वाच्या शहरांबाबत शिथिल केली जाते. दुपारी चारपर्यंतच व्यवहारांना परवानगी असल्याने आता शहरातील सर्वच व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, नियमांचे उल्लंघन करून बऱ्याच जणांनी दुपारी चारनंतर दुकाने खुली ठेवण्यास सुरुवात केली आहे.
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी गेल्या तीन आठवड्यांतील कोरोनाबाधितांचा दर, चाचण्यांची संख्या आणि रुग्णांच्या संख्येची माहिती थेट आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनाच पाठवली आहे; तसेच रुग्णवाढीचा दर कमी होत असल्याने शहरातील निर्बंध तातडीने शिथिल करण्याची मागणी केली आहे.
पुणे शहरातील कोरोनाच्या संसर्गाची स्थिती किती नियंत्रणात आहे, हे सांगण्यासाठी अलीकडच्या कालावधीतील आकडेवारी पुरेशी बोलकी आहे. सद्यस्थितीत दुपारी चारपर्यंतची वेळ सर्वांसाठीच अडचणीची ठरत असून, व्यावसायिक, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक यांना सर्वांना निर्बंधांत शिथिलता हवी आहे.