आरोग्य

१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचे लवकरच नियोजन..

राजापूर शहरात प्रभाग निहाय लसीकरणाला चांगला प्रतिसाद..

प्रतिनिधी : अद्वैत अभ्यंकर

राजापूर दि. ३० जून :-
राजापूर शहरात पाच जून पासून राबविण्यात आलेल्या प्रभागनिहाय लसीकरण मोहीमेत सुमारे १ हजार ५० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. या मोहीमेत ४५ वर्षाच्या पुढील वयोगटातील आणि खास करून जेष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. शहरातील आठ प्रभागात राबविण्यात आलेल्या या लसीकरण मोहीमेत आत्तापर्यंत सुमारे १ हजार ५० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. शहरातील काही नागरिकांनी यापुर्वी करण्यात आलेल्या लसीकरण मोहीमेत नाव नोंदणी करत लस घेतली आहे. त्यामुळे शहरात आता लसीकरण झालेल्या नागरिकांची संख्या सुमारे २ हजार पर्यंत पोहचली आहे. शासनाने आता १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांची लसीकरण मोहीम हाती घेतल्यामुळे शहरातीलदेखील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची मोहीम हाती घेतली असून ही मोहीम देखील प्रभाग निहाय राबविण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे नगराध्यक्ष अँड. खलिफे यांनी सांगितले. राजापूर शहरात शंभर टक्के लसीकरणाचे उद्दीष्ट असून नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवा, सोशल मिडीयावरील व्हीडीओ, मेसेज यांना बळी न पडता लसीकरणासाठी पुढे यावे असे आवाहन नगराध्यक्ष अँड. खलिफे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!